युक्रेनसाठी अवघा युरोप एकत्र; युद्ध संपविण्यासाठी ब्रिटन, फ्रान्स आणि युक्रेन योजनेवर काम करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2025 11:34 IST2025-03-03T11:32:54+5:302025-03-03T11:34:04+5:30
अमेरिकेकडून गॅरंटी घेणार

युक्रेनसाठी अवघा युरोप एकत्र; युद्ध संपविण्यासाठी ब्रिटन, फ्रान्स आणि युक्रेन योजनेवर काम करणार
लंडन : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयात झालेल्या वादामुळे युक्रेन संकटात सापडला असून, युक्रेनसाठी युरोपीय देश एकवटले आहेत. ब्रिटन, फ्रान्स आणि युक्रेन आणि युद्ध संपविण्याच्या प्लॅनवर काम करण्यास एकत्र येण्याचे मान्य केले असून, हा प्लॅन अमेरिकेला सादर करत युक्रेनच्या सुरक्षेची गॅरंटी घेतली जाणार आहे. ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टॉर्मर यांनी ही माहिती दिली.
हे युद्ध संपविण्यासाठी आणि युक्रेनला संरक्षण देण्यासाठी लंडनमध्ये युरोपियन नेत्यांच्या शिखर परिषदेचे आयोजन केले आहे. यावेळी युरोपच्या सुरक्षेसाठी 'दुर्मिळ क्षण' वाया घालवू नका, असे आवाहन स्टॉर्मर यांनी केले.
संबंध सुधारा : नाटो
नाटोचे सरचिटणीस मार्क रुट्टे यांनी गरमागरम वादविवादानंतर ट्रम्प यांच्याशी संबंध सुधारा असे झेलेन्स्की यांना सांगितले आहे. (वृत्तसंस्था)
मिठी मारत दिला पाठिंबा
ट्रम्प यांच्याशी झालेल्या वादानंतर ब्रिटनमध्ये आलेल्या युक्रेनियन राष्ट्राध्यक्षांना ब्रिटनचे पंतप्रधान स्टॉर्मर यांनी मिठी मारत आमचा तुम्हाला अखेरपर्यंत पाठिंबा असल्याचा शब्द दिला. शनिवारी झेलेन्स्की जेव्हा ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या कार्यालयात पोहोचले तेव्हा बाहेर जमलेले लोक त्यांच्या समर्थनाच्या घोषणा देत होते.
टेस्ला शोरूमबाहेर निदर्शने
खर्चात कपात करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून उद्योगपती इलॉन मस्क यांनी उचललेल्या पावलांच्या विरोधात अमेरिकेतील टेस्ला शोरूमच्या बाहेर निदर्शकांनी निदर्शने केली. आम्ही मस्क यांचा बदला घेऊ शकतो. आम्ही सर्वत्र शोरूममध्ये जाऊन टेस्लावर बहिष्कार टाकून कंपनीचे थेट आर्थिक नुकसान करू शकतो, आंदोलक म्हणत आहेत.
युक्रेनच्या बाजूने कोणते देश?
फ्रान्स, जर्मनी, डेन्मार्क, इटली, नेदरलँड, नॉर्वे, पोलंड, स्पेन, कॅनडा, फिनलंड, स्वीडन, झेक प्रजासत्ताक आणि रोमानिया यांच्यासह २७ देशांचे नेते सध्या सुरू असलेल्या बैठकीत सहभागी झाले असून, यात मदत वाढवण्याच्या निर्णयाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
युक्रेनला सर्वाधिक मदत नेमकी कोणत्या देशाची?
अमेरिकेने युक्रेनला आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे ११९.२ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी मदत दिली असून, इतर देशांनी अतिशय कमी प्रमाणात आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. त्यामुळे अमेरिकेने पाठिंबा काढल्यास युक्रेनचे काय होईल, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
अमेरिकन लोक म्हणतात...
रिपब्लिकन पक्षातील नागरिक डेमोक्रॅट्सपेक्षा चार पट अधिक संख्येने युक्रेनला दिली जाणारी मदत कमी करण्याच्या बाजूने आहेत. हे ट्रम्प यांच्या ‘अमेरिका-प्रथम’ धोरणाशी सुसंगत आहे. ६० टक्के रिपब्लिकन नागरिक यूएसएड मदत कमी किंवा पूर्णपणे रद्द करावी, असे म्हणत आहे. अमेरिकेतील ६२ टक्के लोक युक्रेनला सहानुभूती दर्शवतात, तर केवळ ४ टक्के रशियाला समर्थन देतात. यूगर्व्हच्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.
युक्रेनला सर्वाधिक मदत कुणी दिली?
अमेरिका ११९.२
युरोपियन संघ ५२.१
जर्मनी १८.१
ब्रिटन १५.४
जपान ११.०
कॅनडा ८.७
डेन्मार्क ८.४
नेदरलँड्स ७.७
स्वीडन ५.७
फ्रान्स ५.१