Apple News: स्मार्टफोन, स्मार्टवॉच या क्षेत्रात Apple कंपनी जगभरातील कंपन्यांच्या तुलनेत आघाडीवर आहे. जगभरात Apple कंपनीचे आयफोन किंवा स्मार्टवॉच, बँड प्रचंड मोठ्या प्रमाणात विकले जातात. Apple कंपनीच्या नवीन प्रोडक्टची ग्राहक आतुरतेने वाट पाहत असतात. परंतु, Apple कंपनीच्या एका प्रोडक्टमुळे युझरला कॅन्सरचा धोका निर्माण होत असल्याचा दावा केला जात आहे. यावरून Apple कंपनीवर टीका केली जात आहे. या दाव्यावरून Apple कंपनीविरोधात एक खटला दाखल करण्यात आला असून, यावरून सोशल मीडियावर उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.
डेली मेल युके यांनी यासंदर्भात एक अहवाल सादर केला आहे. यावरून आता युझर्समध्ये संभ्रमाचे वातावरण असल्याचे बोलले जात आहे. काही युझर्स या खटल्याच्या वैधतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. तर काही युझर्स या खटल्यात केलेल्या दाव्यांबाबत चिंता व्यक्त करत आहेत.
नेमके प्रकरण काय?
अमेरिकेत विविध कंपन्यांच्या २२ स्मार्टवॉच बँडवर अलीकडेच संशोधन वजा अभ्यास करण्यात आला. यामधून समोर आलेल्या दाव्यांवरून खटला दाखल करण्यात आला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या २२ स्मार्टवॉच बँडपैकी १५ स्मार्टवॉच बँडम्ये हानिकारक PFAS रसायने होती. या रसायनांच्या संपर्कात आल्याने आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात, असे म्हटले जाते. या घड्याळांपैकी काही घड्याळे Apple कंपनीने बनवली होती. या अभ्यासातून समोर आलेल्या गोष्टींमध्ये या रसायनांमुळे जन्म दोष, मूत्रपिंडाशी संबंधित आजार, प्रजनन समस्या आणि कॅन्सर अशा गंभीर स्वरुपाच्या समस्यांचा निर्माण होऊ शकतात, असा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, Apple कंपनीकडून दावा करण्यात आला आहे की, त्यांची उत्पादने फ्लोरोइलास्टोमर वापरून तयार केली जातात. हा एक कृत्रिम रबर आहे. यामध्ये फ्लोरिन असते. परंतु, या खटल्यात कंपनीच्या म्हणण्याला आव्हान देण्यात आले आहे आणि म्हटले आहे की, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनीने इतर सर्व उत्पादन साहित्यात कृत्रिम रबरमध्ये प्रत्यक्षात PFAS असल्याचे तथ्य लपवले आहे. या खटल्याचा मुख्य मुद्दा असा आहे की, Apple ने जाणूनबुजून हे तथ्य लपवले की, त्यांच्या उत्पादनात असे रसायने आहेत, ज्यामुळे युझर्सना कर्करोगाचा धोका निर्माण करू शकतात. विशेष म्हणजे Appleचे हे स्मार्टवॉच बँड सामान्यतः आरोग्याला चालना देणारे उपकरण म्हणून प्रमोट केले जातात. यामध्ये हॉर्ट रेट, पल्स रेट, स्लीप हेल्थ, स्टेप्स आणि अनेकविध प्रकारच्या सुविधा ऑफर करण्यात आलेल्या असतात.