Donald Trump Pakistan Deal: "आम्ही त्या कंपनीची निवड करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहोत, जी या भागीदारीचे नेतृत्व करेल. कोणाला माहितीये की, कदाचित एक दिवस पाकिस्तानचभारताला तेल विकेल." हे विधान आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे! रशियाकडून तेल आणि शस्त्रास्त्रे खरेदी करत असल्याचा मुद्दा समोर करत ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ लागू करण्याची घोषणा केली. त्यानंतर पुढील काही तासातच अमेरिकेने तेल साठवण साठ्यांच्या उभारणीसंदर्भात पाकिस्तानसोबत एक महत्त्वाचा करार केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
३० जुलै रोजी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर १ ऑगस्टपासून टॅरिफ लागू करणार असल्याची घोषणा केली. भारताने रशियाकडून तेल आयात आणि शस्त्रास्त्रे खरेदी सुरूच ठेवली, तर त्यांना दंडही आकारला जाईल, असा दुहेरी झटका डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिला. ट्रम्प यांच्या या घोषणेनंतर अमेरिकेने पाकिस्तानसोबतचा एक करार पूर्ण केला. पाकिस्तानात तेल साठे विकसित करण्यासाठी अमेरिका मदत करणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी कराराबद्दल दिली माहिती
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून याची माहिती दिली.
"आम्ही पाकिस्तानसोबत एक नवीन करार केला आहे. यानुसार अमेरिका आणि पाकिस्तान मिळून मोठे तेल साठे उभारणार आहेत. यासाठी आम्ही तेल कंपनीच्या निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे. ही तेल कंपनी दोन्ही देशाच्या भागीदारीतून होणाऱ्या या कामाचे नेतृत्व करेल. कोणाला माहिती, कदाचित एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल", असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी मानले ट्रम्प यांचे आभार
अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये करार झाल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आभार मानले. "मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी या ऐतिहासिक अमेरिका-पाकिस्तान व्यापार करारावर शिक्कामोर्तब करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे", असे शरीफ म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदी करण्यास भारताला विरोध केला आहे. त्यामुळेच २५ टक्के टॅरिफ लागू करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. भारताच्या तेल आणि शस्त्रास्त्रे खरेदीमुळे रशियाला ताकद मिळत असून, त्यामुळेच रशियाने युक्रेनवर हल्ले सुरूच ठेवले आहेत, असे ट्रम्प यांचं म्हणणं आहे.
भारतावर २५ टक्के टॅरिफ लागू करण्याची घोषणा केल्यानंतर ट्रम्प यांनी आणखी एक झटका दिला. ट्रम्प यांनी इराणकडून तेल खरेदी करणाऱ्या काही भारतीय कंपन्यांवर बंदी घातली आहे.