न्यूयॉर्क/वाॅशिंग्टन: अमेरिका आणि पाकिस्तान यांनी एका व्यापार करारावर स्वाक्षऱ्या केल्या असल्याची घोषणा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. अमेरिका ‘विशाल तेलसाठे’ विकसित करण्यासाठी पाकिस्तानसोबत काम करेल. एक दिवस पाकिस्तान कदाचित भारतालाही तेल विकू शकेल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
तथापि, ट्रम्प हे पाकच्या कोणत्या तेल भांडारांचा उल्लेख करत आहेत, हे स्पष्ट झाले नाही. या करारावर बुधवारी वॉशिंग्टनमध्ये दोन्ही देशांनी स्वाक्षऱ्या केल्या. भारत आणि रशिया हे त्यांच्या मृतवत अर्थव्यवस्था एकत्रच खड्ड्यात घालू शकतात, अशी उद्विग्न टीकाही ट्रम्प यांनी केली आहे. भारताविरूद्ध २५ टक्के आयात शुल्क १ ऑगस्टपासून लागू होईल, असे जाहीर केल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
कुठे आहेत पाकी तेलसाठे?
पाकिस्तान आपल्या किनाऱ्यालगतच्या समुद्रात मोठे तेलसाठे असल्याचा दावा करीत आला आहे. तथापि, या तेलाच्या उत्खननात पाकला आतापर्यंत कोणतीही प्रगती करता आलेली नाही. हे तेलसाठे काढण्यासाठी गुंतवणूक आकर्षित करण्याचा प्रयत्न पाककडून सुरू आहे. सध्या पाकिस्तान आपली गरज पश्चिम आशियातून आयात तेलावर भागवतो. पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ‘एक्स’वर लिहिले की, अमेरिका व पाकिस्तान व्यापार करार ऐतिहासिक आहे.
काय म्हणाले मंत्री गोयल?
वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी गुरुवारी लोकसभेत सांगितले की, सरकार आपल्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक सर्व पावले उचलेल. इंग्लंडबरोबर नवे व्यापक आर्थिक व व्यापार करारासह इतर व्यापार करार झाले आहेत. तथापि, गोयल यांनी रशियन तेल करार व अमेरिका - पाकिस्तान तेल कराराचा उल्लेख करणे टाळले. यावर काही खासदारांनी वैयक्तिक मत नोंदवले असले तरी भाजपने याबाबत मौन बाळगले आहे.