रशियाच्या वेटलिफ्टर्सवर आॅलिम्पिक बंदी?
By Admin | Updated: June 23, 2016 18:54 IST2016-06-23T18:54:45+5:302016-06-23T18:54:45+5:30
रशियाच्या वेटलिफ्टर्सकडून वारंवार डोपिंग नियमांची पायमल्ली होत असल्यामुळे त्यांना रिओ आॅलिम्पिकमध्ये सहभागापासून वंचित ठेवले जाण्याची दाट शक्यता आहे

रशियाच्या वेटलिफ्टर्सवर आॅलिम्पिक बंदी?
ऑनलाइन लोकमत
पॅरिस, दि. 23 - रशियाच्या वेटलिफ्टर्सकडून वारंवार डोपिंग नियमांची पायमल्ली होत असल्यामुळे त्यांना रिओ आॅलिम्पिकमध्ये सहभागापासून वंचित ठेवले जाण्याची दाट शक्यता आहे. रशियाच्या अॅथ्लीटस्ना आॅगस्टमध्ये रिओत होणाऱ्या आॅलिम्पिकपासून दूर ठेवण्यात आल्यानंतर आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीने देखील हा बंदीचा निर्णय कायम ठेवला. आंतरराष्ट्रीय भारोत्तोलन महासंघाने असाच निर्णय घेतल्याने रशियाच्या क्रीडा क्षेत्रावर संकट कोसळले आहे. भारोत्तोलनातील सर्वोच्च संस्थेने रशिया, कझाखस्तान आणि बेलारुसच्या खेळाडूंचे २००८ तसेच २०१२ च्या आॅलिम्पिकमधील चाचणीचे नमुने फेरपरीक्षणासाठी ताब्यात घेतले होते. हे नमुने पॉझिटिव्ह येताच खेळाडूंचे भविष्य धोक्यात आले आहे.
पॉझिटिव्ह खेळाडूंना वर्षभर बंदीला सामोरे जावे लागेल. उत्तर कोरियाचे खेळाडू आधीच डोपिंगच्या आरोपात बंदीचा समना करीत आहेत. भारोत्तोलन महासंघ या खेळाला डोपिंगमुक्त करण्याच्या प्रयत्नात असताना काही देशांच्या खेळाडूंनी मात्र महासंघाच्या प्रयत्नांवर पाणी फेरले. ज्या देशांच्या खेळाडूंची चाचणी अपयशी ठरते त्या देशावर वर्षभराची बंदी लावण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय महासंघाने घेतला. खेळाडूंच्या दुसऱ्या नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला किंवा नाही, याची खात्री झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समिती बंदीबाबतचा अंतिम निर्णय घेणार आहे.