ओबामांच्या असुरक्षित ताजमहाल भेटीच्या आड आला सुप्रीम कोर्टाचा आदेश
By Admin | Updated: January 24, 2015 15:59 IST2015-01-24T15:59:17+5:302015-01-24T15:59:17+5:30
ओबामा यांना सुरक्षेच्या कारणावरून ताजमहाल भेट रद्द करावी लागल्याचे स्पष्ट होत असून त्यामागे सुप्रीम कोर्टाचा एक आदेश असल्याचे वृत्त
ओबामांच्या असुरक्षित ताजमहाल भेटीच्या आड आला सुप्रीम कोर्टाचा आदेश
ऑनलाइन लोकमत
आग्रा, दि. २४ - आमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना सुरक्षेच्या कारणावरून ताजमहाल भेट रद्द करावी लागल्याचे स्पष्ट होत असून त्यामागे सुप्रीम कोर्टाचा एक आदेश असल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. ताज महालपासून ५०० मीटर अंतरावर भेट द्यायला येणा-यांनी आपल्या गाड्या ठेवाव्यात आणि नंतर इलेक्ट्रिक कारने आत ताजपर्यंत जावे असा आदेश याआधी सुप्रीम कोर्टाने दिला होता. याचा आधार घेत ओबामा यांच्या बुलेटप्रूफ वाहनांचा ताफा शिल्पग्राम संकुलाच्या इथे थांबवावा लागेल आणि पुढचा प्रवास इलेक्ट्रिकवर चालणा-या अंतर्गत वाहनाने करावा लागेल. ओबामा यांच्या सुरक्षा यंत्रणेने ही जोखीम पत्करता येणार नाही असे सांगत या तडजोडीस नकार दर्शवला.
सुप्रीम कोर्टाकडून अपवाद म्हणून ओबामा यांच्या वाहनाचा ताफा आत जाऊ द्यावा असे गृहमंत्रालयाच्या ज्येष्ठ अधिका-यांना ओबामा यांच्या सुरक्षा सल्लागारांनी सांगितले, परंतु इतक्या कमी कालावधीत हे शक्य नसल्याचे अधिका-यांनी म्हटल्याचे एक्स्प्रेसने म्हटले आहे.
२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त होणा-या सोहळ्यासाठी ओबामा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.उद्या सकाळी त्यांचे भारतात आगमन होणार असून त्या पार्श्वभूमीवर देशभरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यानंतर २७ जानेवारी रोजी ओबामा आग्रा येथे जाऊन जगातील आठ आश्चर्यांपैकी एक मानल्या जाणा-या 'ताजमहाल'ला भेट देणार होते, मात्र आता त्यांचा आग्रा दौरा रद्द झाला आहे.
सौदी अरेबियाचे राजे अब्दुल्ला बिन अब्दुल अजीज यांचे निधन झाले असून ओबामा त्यांच्या अंत्यसंस्कारांसाठी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे २७ जानेवारी रोजी ओबामा दिल्लीहून थेट सौदी अरेबियाला रवाना होतील.