अमेरिकेत बेकायदेशीर राहणा-या ४.५ लाख भारतीयांना ओबामांचा दिलासा
By Admin | Updated: November 21, 2014 13:24 IST2014-11-21T13:18:45+5:302014-11-21T13:24:07+5:30
विदेशातून येऊन अमेरिकेत बेकायदेशीररित्या राहणा-या सुमारे एक कोटी नागरिकांसाठी इमिग्रेशन धोरणात अमुलाग्र बदल करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केली आहे.

अमेरिकेत बेकायदेशीर राहणा-या ४.५ लाख भारतीयांना ओबामांचा दिलासा
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. २१ - विदेशातून येऊन अमेरिकेत बेकायदेशीररित्या राहणा-या सुमारे एक कोटी नागरिकांसाठी इमिग्रेशन धोरणात अमुलाग्र बदल करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केली आहे. याचा लाभ अमेरिकेत बेकायदेशीररित्या राहणा-या सुमारे साडे चार लाख भारतीयांनाही होणार आहे.
गुरुवारी अमेरिकेच्या जनतेला संबोधित करताना ओबामा यांनी ही घोषणा केली. अमेरिकेचे इमिग्रेशन धोरण हे दोषयुक्त असून यामध्ये आम्ही अमुलाग्र बदल करणार आहोत असे ओबामा यांनी सांगितले. नवीन धोरणाला अद्याप अमेरिकन काँग्रेसची मंजूरी मिळालेली नाही. मात्र राष्ट्राध्यक्षांना असलेल्या अधिकाराचा वापर करुन यामध्ये बदल करता येईल असे ओबामांनी स्पष्ट केले. अमेरिकेत सध्या विविध देशांमधून आलेले एक कोटी नागरिक बेकायदेशीरित्या वास्तव्य करत असून अमेरिकेतील विद्यमान इमिग्रेशन धोरणानुसार या सर्वांवर कधीही कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. मात्र ओबामा यांनी इमिग्रेशन धोरणात बदल करण्याचा निर्णय घेतल्याने या एक कोटी लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या स्थलांतरित नागरिकांमध्ये मॅक्सिको या देशातील नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे.