ओबामांनी मागितली नवविवाहीत दाम्पत्त्याची माफी
By Admin | Updated: December 31, 2014 15:19 IST2014-12-31T15:19:58+5:302014-12-31T15:19:58+5:30
अमेरिकेतील हवाई येथे बराक ओबामा यांच्या दौ-याचा फटका एका नवविवाहीत दाम्पत्त्याला बसला खरा पण त्यानंतर खुद्द ओबामांनी या दाम्पत्त्याला फोन करुन माफी मागितली आहे.

ओबामांनी मागितली नवविवाहीत दाम्पत्त्याची माफी
>ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. ३१ - व्हीआयपींची सुरक्षा व्यवस्था हा सर्वसामान्य भारतीयांसाठी नेहमीच डोकेदुखीचा विषय असतो. व्हीआयपी मंडळी सुरक्षा व्यवस्थेचा फटका बसलेल्यांची माफी मागण्याची तसदीही घेत नाहीत. पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे मात्र याला अपवाद असावेत. अमेरिकेतील हवाई येथे बराक ओबामा यांच्या दौ-याचा फटका एका नवविवाहीत दाम्पत्त्याला बसला खरा पण त्यानंतर खुद्द ओबामांनी या दाम्पत्त्याला फोन करुन माफी मागितली आणि त्यांना लग्नाच्या शुभेच्छाही दिल्या.
अमेरिकन सैन्यात कॅप्टन म्हणून कार्यरत असणारी नताली आणि एडवर्ड या दोघांचा रविवारी विवाह होता. या दोघांनी साधारणतः महिनाभरापूर्वीच लग्नासाठी हवाईतील गोल्फ कोर्स बुक केले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, त्यांचे कुटुंब व मित्रमंडळी हिवाळी सुट्टीनिमित्त हवाईत दाखल झाले होते. रविवारी ओबामा आणि त्यांच्या मित्रांनी हवाईतील गोल्फ कोर्सवर गोल्फ खेळण्याचा बेत आखला. ओबामांच्या सुरक्षा व्यवस्थेमुळे गोल्फ कोर्स व्यवस्थापनाने नताली आणि एडवर्ड यांच्या विवाहाची जागा बदलून दुस-या जागेवर त्यांची सोय केली. मात्र आयत्या वेळी जागा बदलल्याने नियोजनात गोंधळ उडाला आणि एडवर्ड - नतालीला नाहक मनस्ताप सोसावा लागला. हा सर्व प्रकार समजताच ओबामा यांनी थेट त्या दाम्पत्त्याला फोन करत व्हिडीओ कॉलिंगद्वारे त्यांच्याशी संवाद साधला. 'तुमचे लग्न १६ नंबरच्या गोल्फ कोर्समध्ये होणार आहे हे मला माहित असते तर मी तिथे आलोच नसतो. तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल मी माफी मागतो आणि तुमच्या लग्नाला शुभेच्छाही देतो' असे ओबामांनी त्या दाम्पत्त्याला सांगितले. दस्तुरखुद्द राष्ट्राध्यक्षांनी फोन करुन माफी मागितल्याने नताली आणि एडवर्डचा सुखद धक्काच बसला होता.