ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दासिल्वा यांनी अमेरिकेसोबतच्या बिघडत्या द्विपक्षीय संबंधांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. ट्रम्प बोलू इच्छित नसल्यामुळे ते आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन करणार नाहीत, असे त्यांनी मंगळवारी स्पष्टपणे सांगितले. अमेरिकेने ब्राझिलियन उत्पादनांवर ५०% पर्यंत आयात शुल्क लादल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध प्रचंड ताणले गेले आहेत. हे ब्राझील-अमेरिका संबंधांमधील सर्वात खेदजनक दिवस असल्याचे लुला यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, "अमेरिकेच्या या एकतर्फी निर्णयाविरुद्ध आम्ही जागतिक व्यापार संघटनेसारख्या सर्व आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर जाऊ."मोदी आणि जिनपिंग यांच्याशी बोलणार!ब्राझीलचे अध्यक्ष लुला पुढे म्हणाले, की ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी संपर्क साधतील. मात्र, या दरम्यान त्यांना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी बोलता येणार नसल्याचे देखील त्यांनी म्हटले. "मी शी जिनपिंग यांना फोन करेन, मी पंतप्रधान मोदींना फोन करेन, पण ट्रम्प यांना फोन करणार नाही", असे ते म्हणाले.
अमेरिकेचा इशारा, ब्रिक्सपासून अंतर ठेवा!ट्रम्प प्रशासनाने ब्रिक्स देशांना आधीच इशारा दिला होता की, जर त्यांची धोरणात्मक भूमिका अमेरिकेच्या हिताच्या विरुद्ध असल्याचे आढळून आले तर, अतिरिक्त १०% कर लादला जाईल. ब्रिक्सचा भाग असलेले ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका आता अमेरिकेच्या जागतिक धोरणासाठी आव्हान बनत आहेत.
व्यापार वादाबरोबरच, ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाने माजी राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांना नजरकैदेत ठेवण्याच्या निर्णयामुळे अमेरिकेचा संताप आणखी वाढला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या वेस्टर्न हेमिस्फीअर ब्युरोने या निर्णयावर टीका केली आणि म्हटले की, "मानवी हक्कांच्या उल्लंघनासाठी अमेरिकेने मॅग्निटस्की कायद्याअंतर्गत न्यायमूर्ती अलेक्झांडर डी मोरैस यांच्यावर निर्बंध लादले आहेत. विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी न्यायालयाचा वापर केला जात आहे." अमेरिकेच्या निर्बंधांना न जुमानता ते त्यांचे न्यायालयीन काम सुरू ठेवतील आणि त्यांचे काम देशाच्या संविधान आणि कायद्याच्या आत असेल, असे न्यायमूर्ती डी मोरैस यांनी सांगितले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, व्यापार वाद सोडवण्यासाठी लुला कधीही त्यांच्याशी फोनवर बोलू शकतात. ब्राझीलचे अर्थमंत्री फर्नांडो हद्दाद यांनीही ट्रम्प यांच्या या कृतीचे स्वागत केले होते. परंतु, लूला यांनी आता आपण पुढाकार घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.