न्यूयॉर्क भारतीय मुलीला देणार 2.25 लाख डॉलर
By Admin | Updated: September 19, 2014 01:37 IST2014-09-19T01:37:25+5:302014-09-19T01:37:25+5:30
अमेरिकेतील भारतीय मुत्सद्याच्या मुलीने दाखल केलेला खटला तडजोडीने मिटविण्याकरिता न्यूयॉर्क शहराने तिला 2 लाख 25 हजार डॉलर देऊ केले आहेत.

न्यूयॉर्क भारतीय मुलीला देणार 2.25 लाख डॉलर
न्यूयॉर्क : अमेरिकेतील भारतीय मुत्सद्याच्या मुलीने दाखल केलेला खटला तडजोडीने मिटविण्याकरिता न्यूयॉर्क शहराने तिला 2 लाख 25 हजार डॉलर देऊ केले आहेत. कीर्तिका बिस्वास असे या मुलीचे नाव असून कायदेशीर लढाईतील तिचा हा एकप्रकारचा विजय मानला जातो.
आपल्या शिक्षकास अश्लील ई-मेल पाठविल्याच्या संशयावरून कीर्तिकाला अटक करण्यासह
शाळेतून निलंबित करण्यात आले होते. निरपराध असतानाही कारवाई झाल्यामुळे कीर्तिकाने न्यूयार्क
शहर, शिक्षण मंडळ आणि न्यूयॉर्क पोलीस विभागाला न्यायालयात खेचले होते.
खटला मिटविण्यासाठी न्यूयॉर्क शहराने कीर्तिकाला दोन लाख 25 हजार डॉलर देण्याचे मान्य केले. कीर्तिकानेही हा प्रस्ताव स्वीकारत खटला मागे घेण्यास सहमती दर्शविली.
अमेरिकी जिल्हा न्यायाधीश जॉन कोइल्टल यांनी त्यांच्या निकालात म्हटले की, कीर्तिकाला दोन लाख 25 हजार डॉलर देण्याचे न्यूयॉर्कने मान्य केले असून कीर्तिकानेही न्यूयॉर्क शहरासह इतर यंत्रणोविरुद्धचे खटले मागे घेण्याचे मान्य केले आहे. खटल्यामध्ये उपस्थित करण्यात आलेले मुद्दे कोणताही दोष किंवा दायित्व न स्वीकारता न्यायालयाबाहेर सोडविण्याची उभय पक्षांची इच्छा आहे, असेही न्यायाधीशांनी नमूद केले. (वृत्तसंस्था)