New Jersey is prioritizing cigarette smokers for corona virus vaccines because of their risk of severe disease | सिगारेट ओढणाऱ्यांना कोरोना लसीसाठी प्राधान्य... चकित झालात ना?; पण 'या' राज्याचं तसं ठरलंय!

सिगारेट ओढणाऱ्यांना कोरोना लसीसाठी प्राधान्य... चकित झालात ना?; पण 'या' राज्याचं तसं ठरलंय!

ठळक मुद्देराज्यात लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याच्या राज्यपालांच्या सूचनानिर्णयावर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांची टीका

सध्या जगभरात अनेक देशांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरूवात झाली आहे. जगभरातील ३ कोटींपेक्षा अधिक लोकांना ही लस देण्यात आली आहे. तसंच काही दिवसांपासून अमेरिकेतही लसीकरणाला सुरूवात करण्यात आली. दरम्यान, अमेरिकेतील न्यू जर्सी या राज्यानं मात्र घेतलेल्या एका निर्णयामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. या ठिकाणी सिगारेट ओढणाऱ्या लोकांना लसीकरणात प्राधान्य देण्यात येणार असल्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. 

लसीकरण मोहीमेला गती देण्यासाठी आता त्याची व्याप्ती वाढवण्यात यावी असं मत न्यू जर्सीचे आरोग्य आणि मानवी सेवा सचिव अॅलेक्स एझार यांनी स्पष्ट केलं. "१६ ते ६४ या वयोगटातील व्यक्तींपैकी ज्यांना काही गंभीर आजार आहेत त्यांना आता कोरोनाची लस देण्यात आली पाहिजे. अन्य गंभीर आजारांमुळे त्यांना कोरोनाचा धोका वाढतो, असं मतही त्यांनी व्यक्त केलं. दरम्यान, त्यांच्या एझार यांच्या वक्तव्यानंतर कोरोना लसीकरणाची व्याप्ती गुरूवारपासून वाढवली जाणार असल्याची माहिती न्यू जर्सीचे राज्यपाल फिल मर्फी यांनी दिली.

काही आजारांमुळे कोरोना होण्याचा अधिक धोका असलेल्या व्यक्तींना, लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयाचे विकास असलेल्या नागरिकांना प्राधान्य देण्याच्या निर्णयाला यामुळे धक्का बसण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. "निकोटीन हे प्रमुख व्यसनांपैकी एक आहे. धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींना अन्य आजारांचा अधिक धोका असतो. जर धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली तर तो इतरांच्या तुलनेत अधिक लवकर आजारी पडतो," असं राज्याच्या आरोग्य विभागाच्या (संवाद) संचालक डोना ल्युसनर यांनी सांगितलं. आपला नागरिकांचे जीव वाचवणं आणि लसीकरण मोहीम अधिक धोका असलेल्या लोकांपर्यंत पोहोचवणं हे आमचं ध्येय असल्याचंही त्या म्हणाल्या.

न्यू जर्सीच्या प्रशासनानं घेतलेल्या निर्णयानुसार आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांसह आता आता सिगारेट ओढणाऱ्या लोकांनाही लसीकरणासाठी प्राधान्य दिलं जाणार आहे. सीडीसीच्या निर्णयानुसार अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांना लसीकरण मोहिमेत प्राधान्य देणं आवश्यक आहे. परंतु अखेर कोणत्या व्यक्तींना प्राधान्यक्रमानं लस दिली जावी हे त्या त्या राज्यांवरही अवलंबून आहे. न्यूयॉर्क सारख्या राज्यामध्ये लसीकरण मोहिमेत शिक्षकांना प्राधान्य देण्यात येत आहे. दरम्यान, राज्याच्या या निर्णयावर सोशल मीडियातूनही टीका केली जात आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: New Jersey is prioritizing cigarette smokers for corona virus vaccines because of their risk of severe disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.