न्यूयॉर्क/वॉशिंग्टन : ट्रम्प प्रशासनाने नव्या एच-१बी व्हिसासाठी लागू केलेले १ लाख अमेरिकी डॉलर एवढे प्रचंड शुल्क नव्या अर्जदारांसाठीच लागू असेल. २१ सप्टेंबरपूर्वी ज्यांच्याकडे हा व्हिसा आहे किंवा ज्यांनी या तारखेपूर्वीच अर्ज केलेले आहेत, त्यांच्यावर याचा परिणाम होणार नाही, असा खुलासा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने केला आहे. या स्पष्टीकरणामुळे अमेरिकेत कार्यरत हजारो भारतीयांना दिलासा मिळाला आहे.
अमेरिकेलाच जास्त फटकाएच-१बी व्हिसा शुल्क १,००,००० डॉलरपर्यंत वाढवण्याचा घेतलेला निर्णय अमेरिकेलाच अधिक तोट्याचा ठरेल, असे आर्थिक थिंक टँक ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हने म्हटले आहे. थिंक टँकच्या मते, अमेरिकेत पाच वर्षांचा अनुभव असलेल्या आयटी मॅनेजरला १.२० ते १.५० लाख डॉलर पगार मिळतो, एच-१बी व्हिसावर जाणाऱ्यांना त्यापेक्षा सुमारे ४० टक्के कमी वेतन मिळते. म्हणजे हे कर्मचारी स्वस्तात मिळतात. भारतात कार्यरत असलेल्यांना या तुलनेत ८० टक्क्यांपर्यंत कमी पगार मिळतो.
एकदाच शुल्क, वारंवार नाही
१ लाख डॉलर्स शुल्क हे फक्त एकदाच, नव्या एच-१बी व्हिसा अर्जांवर लागणार आहे. सध्याचे व्हिसाधारक सुरक्षित : जे आधीपासूनच एच-१बी व्हिसावर अमेरिकेत काम करत आहेत किंवा परदेशात असून पुन्हा अमेरिकेत परतू इच्छित आहेत, त्यांना हे शुल्क भरावे लागणार नाही. प्रवासाचे अधिकार अबाधित : विद्यमान एच-१बी व्हिसा धारकांचे नेहमीचे आवागमनाचे अधिकार पूर्ववत राहतील. या घोषणेमुळे त्यांच्या प्रवासाच्या नियमांमध्ये कोणताही बदल नाही.फक्त नव्या व्हिसांवर नियम लागू : हे शुल्क फक्त नव्या एच-१बी व्हिसांवर लागू आहे. आधीचे व्हिसा धारक किंवा नूतनीकरण करणाऱ्यांना याचा परिणाम होणार नाही.