‘आयएसआय’ला मिळाले नवे प्रमुख
By Admin | Updated: September 23, 2014 06:28 IST2014-09-23T06:22:56+5:302014-09-23T06:28:18+5:30
पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल राहिल शरीफ यांचे विश्वासू समजले जाणारे लेफ्टनंट जनरल रिझवान अख्तर यांची सोमवारी देशाची गुप्तचर संघटना आयएसआयच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.

‘आयएसआय’ला मिळाले नवे प्रमुख
इस्लामाबाद : पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल राहिल शरीफ यांचे विश्वासू समजले जाणारे लेफ्टनंट जनरल रिझवान अख्तर यांची सोमवारी देशाची गुप्तचर संघटना आयएसआयच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.
लष्करातील व्यापक फेरबदलाचा भाग म्हणून लेफ्टनंट जनरल अख्तर यांना पदोन्नती देत इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स अर्थात आयएसआयच्या महासंचालकपदी नियुक्त करण्यात आले. देशातील राजकीय अस्थिरतेच्या पार्र्श्वभूमीवर ही घडामोड जनरल शरीफ यांना अधिक बळकटी देणारी आहे. रिझवान अख्तर यांच्यासह हिलाल हुसैन, घायूर महमूद, नाझिर बट्ट, नाविद मुख्तार, हिदायत उर रेहमान या मेजर जनरल पदावरील अधिकाऱ्यांनाही पदोन्नती देण्यात आली, अशी माहिती इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सचे महासंचालक मेजर असीम बजवा यांनी दिली. अख्तर यांना आयएसआयच्या महासंचालकपदी, हिदायत यांना पेशावर कॉर्प्सच्या कमांडरपदी, मुख्तार यांना कराचीच्या कमांडरपदी, हुसैन मंगला कॉर्प्स कमांडर, महमूद गुजरानवाला कॉर्प्स कमांडर, तर बट यांची मुख्यालयी दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञानाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)