भारताने दिलेली कार नवाज शरीफ यांनी नाकारली
By Admin | Updated: November 18, 2014 00:16 IST2014-11-18T00:16:27+5:302014-11-18T00:16:27+5:30
शरीफ हे स्वत:ची कार घेऊन येणार आहेत. इतर सर्व राष्ट्रप्रमुखांसाठीच्या कार भारतातून आल्या आहेत, असे नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते खगानाथ अधिकारी यांनी सांगितले

भारताने दिलेली कार नवाज शरीफ यांनी नाकारली
काठमांडू : नेपाळमधील सार्क (दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना) शिखर परिषदेसाठी भारताने दिलेल्या बुलेटप्रूूफ कारचा वापर करण्यास पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी नकार दिला आहे. नेपाळी अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली.
शरीफ हे स्वत:ची कार घेऊन येणार आहेत. इतर सर्व राष्ट्रप्रमुखांसाठीच्या कार भारतातून आल्या आहेत, असे नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते खगानाथ अधिकारी यांनी सांगितले. शरीफ यांनी स्वत:ची कार आणणे हा काही मोठा मुद्दा नाही. अमेरिकी राष्ट्राध्यक्षही इतर राष्ट्रांच्या दौऱ्यादरम्यान स्वत:ची कार वापरतात. त्यामुळे यात काही गैर नाही, असेही या प्रवक्त्याने सांगितले. उभय देशादरम्यानचे संबंध तणावपूर्ण असल्याच्या पार्श्वभूमीवर जाणूनबुजून भारताचा अवमान करण्याच्या हेतूने शरीफ यांनी कार नाकारल्याची अटकळही या प्रवक्त्याने फेटाळली. शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे उभय देशांदरम्यानचे संबंध आॅक्टोबरपासून बिघडले आहेत. भारत, पाकदरम्यान अलीकडेच झालेल्या गोळीबारामुळे २० नागरिक ठार झाले असून हजारो नागरिकांना घरेदारे सोडून पलायन करावे लागले आहे. (वृत्तसंस्था)