नासाचे ‘मॅसेंजर’ बुध ग्रहावर आदळले
By Admin | Updated: May 1, 2015 22:56 IST2015-05-01T22:56:38+5:302015-05-01T22:56:38+5:30
नासाचे ‘मॅसेंजर’ हे अंतराळ यान बुध ग्रहाच्या पृष्ठभागावर अपघातग्रस्त झाल्याने ११ वर्षांपासून सुरू असलेली ऐतिहासिक अंतराळ मोहीम संपुष्टात आली आहे

नासाचे ‘मॅसेंजर’ बुध ग्रहावर आदळले
वॉशिंग्टन: नासाचे ‘मॅसेंजर’ हे अंतराळ यान बुध ग्रहाच्या पृष्ठभागावर अपघातग्रस्त झाल्याने ११ वर्षांपासून सुरू असलेली ऐतिहासिक अंतराळ मोहीम संपुष्टात आली आहे. या मोहिमेत ग्रहाबद्दल महत्त्वाची आकडेवारी आणि हजारो छायाचित्रे प्राप्त झाली होती.
मेरीलँड येथील जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी अप्लाईड फिजिक्स लेबॉरेटरीच्या नियंत्रणकर्त्यांनी या घटनेची पुष्टी केली आहे. मॅसेंजर (मरक्युरी सरफेस, स्पेस एनव्हायर्नमेंट,जिओकेमिस्ट्री अॅण्ड रेंजिंग) नावाचे अंतराळ यान गुरुवारी बुध ग्रहाच्या पृष्ठभागावर धडकले.
३ आॅगस्ट २००४ रोजी मॅसेंजरचे प्रक्षेपण करण्यात आले होते आणि या अंतराळ यानाने १८ मार्च २०११ रोजी बुध ग्रहाच्या कक्षेत फिरणे सुरू केले. मॅसेंजरने मार्च २०१२ पर्यत आपले प्राथमिक लक्ष्य साध्य केले होते.
मॅसेंजरच्या प्रारंभिक मोहिमेत काही नवे आणि महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले होते. त्यामुळे या मोहिमेचा नव्याने विस्तार करण्यात आला होता. फार कमी उंचीवरून अवलोकन करणे, छायाचित्रे काढणे आणि ग्रहाबद्दल अभूतपूर्व माहिती गोळा करण्याची अत्यंत महत्त्वाची कामगिरी मॅसेंजरने यश्स्वीरीत्या पूर्ण केली होती.
गेल्या महिन्यात या मोहिमेचा एक अंतिम आणि आपत्कालीन विस्तार करण्यात आला होता. या काळात अंतराळयानाने ग्रहाच्या अगदी जवळून पृष्ठभागापासून केवळ ५ ते ३५ किमी उंचीवर काम केले. २८ एप्रिलला या पथकाने अंतिम संशोधनही पूर्ण केले होते. यासाठी मॅसेंजरला अतिरिक्त एक महिना हवेत राहावे लागले होते. (वृत्तसंस्था)