मुशर्रफ बरळले, म्हणे कारगिलमध्ये पाकने भारताचा गळाच पकडला होता
By Admin | Updated: May 18, 2015 13:01 IST2015-05-18T13:01:43+5:302015-05-18T13:01:43+5:30
१९९९ मध्ये भारत - पाकिस्तानमध्ये झालेल्या कारगिल युद्धात पाकने भारताचा गळाच पकडला होता असे सांगत पाकचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली आहे.

मुशर्रफ बरळले, म्हणे कारगिलमध्ये पाकने भारताचा गळाच पकडला होता
>ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. १८ - १९९९ मध्ये भारत - पाकिस्तानमध्ये झालेल्या कारगिल युद्धात पाकने भारताचा गळाच पकडला होता असे सांगत पाकचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली आहे. भारत हे युद्ध कधीच विसरणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
ऑल पाकिस्तान मुस्लीम लीग या पक्षाच्या कार्यक्रमात संबोधित करताना परवेझ मुशर्रफ यांनी कारगिल युद्धाविषयी भाष्य केले. मुशर्रफ म्हणाले, त्या युद्धात आम्ही चार बाजूंनी कारगिलमध्ये शिरलो व भारतीय सैन्याला याची कल्पनाच नव्हती. कारगिलमध्ये प्रवेश करणा-यांमध्ये दुस-या स्तरावरील सशस्त्र दलातील जवानांचा समावेश होता व या युद्धानंतरच आम्ही त्या दलाला सैन्याचा दर्जा दिला असे त्यांनी सांगितले. १९९९ मध्ये भारत व पाकिस्तानमध्ये कारगिल येथे युद्ध झाला होता. १९७१ नंतरचा हे सर्वात मोठे युद्ध होते. हजारहून अधिक घुसखोरांनी नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीतील कारगिलवर ताबा मिळवला होता. या उंच ठिकाणावरुन लेह व लडाखला श्रीनगरने जोडणा-या महामार्गावर नजर ठेवणे शक्य झाले असते. पण भारतीय सैन्याने या घुसखोरांना चोख प्रत्युत्तर देत युद्धात विजय मिळवला होता.