न्यूयॉर्क पोलिसांतील दोन अधिका-यांची हत्या
By Admin | Updated: December 22, 2014 02:54 IST2014-12-22T02:54:12+5:302014-12-22T02:54:12+5:30
न्यूयॉर्क पोलिसांतील दोन अधिकारी गस्त घालत असताना, त्यांना अगदी जवळून गोळ्या घालून ठार मारण्यात आले
न्यूयॉर्क पोलिसांतील दोन अधिका-यांची हत्या
न्यूयॉर्क : न्यूयॉर्क पोलिसांतील दोन अधिकारी गस्त घालत असताना, त्यांना अगदी जवळून गोळ्या घालून ठार मारण्यात आले असून, हल्लेखोराने नंतर स्वत:ही गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली आहे. अमेरिकेत गौरवर्णीय पोलिसांनी नि:शस्त्र कृष्णवर्णीयांची हत्या केल्यानंतर संपूर्ण देशभर उफाळलेल्या आंदोलनानंतर काही आठवड्यातच हे हत्याकांड झाले आहे. त्यामुळे बदला म्हणून हे हत्याकांड केले असावे, असे मानले जात आहे.
हत्या झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे वेन्जिन लिऊ (न्यूयॉर्क पोलीस खात्यात सात वर्षे नोकरी, ज्येष्ठ अधिकारी ) व राफेल रामोस (न्यूयॉर्क पोलीस खात्यात दोन वर्षे नोकरी). हल्लेखोर २८ वर्षांचा कृष्णवर्णीय युवक असून त्याचे नाव इस्माईल ब्रिन्सले आहे. मूळ बाल्टिमोरचा असणारा हा युवक ३०० कि.मी. प्रवास करून न्यूयॉर्कला येऊन त्याने हे हत्याकांड केले आहे. ब्रिन्सले याने सोशल वेबसाईटवर कृष्णवर्णीयांच्या हत्येचा सूड म्हणून पोलीस अधिकाऱ्यांना ठार मारणार असल्याचे लिहिले आहे. मायकेल ब्राऊन व एरिक गार्नर या दोन कृष्णवर्णीयांना पोलिसांनी नि:शस्त्र असताना मारले होते. न्यूयॉर्कचे मेअर बिल डी ब्लासियो यांनी दिलेल्या माहितीनुसार , आणखी तपशील पाहिला जात आहे; पण सध्या तरी ही हत्या आहे. (वृत्तसंस्था)