पाकच्या कारवाईत मुल्ला फजलुल्लाह ठार?

By Admin | Updated: December 21, 2014 02:26 IST2014-12-21T02:26:27+5:302014-12-21T02:26:27+5:30

पाकिस्तान लष्कराने केलेल्या कारवाईत तालिबान प्रमुख मुल्ला फजलुल्लाह व अन्य काही दहशतवादी ठार झाल्याचे सांगण्यात येते.

Mullah Fazlullah killed in Pak's action | पाकच्या कारवाईत मुल्ला फजलुल्लाह ठार?

पाकच्या कारवाईत मुल्ला फजलुल्लाह ठार?

सरकारकडून अद्याप दुजोरा नाही : पाकिस्तानी संरक्षण मंत्रालयाच्या टिष्ट्वटर अकाऊंटवरील वृत्त, अफगाणिस्तानात हवाई हल्ला
इस्लामाबाद : पेशावरमध्ये लष्कर चालवीत असलेल्या शाळेवर १६ डिसेंबर रोजी तालिबान्यांनी केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान लष्कराने केलेल्या कारवाईत तालिबान प्रमुख मुल्ला फजलुल्लाह व अन्य काही दहशतवादी ठार झाल्याचे सांगण्यात येते. दुसरीकडे तालिबान्यांनी आम्ही राजकीय नेत्यांची मुले ठार मारू, अशी धमकी दिली आहे. पाकिस्तानने फाशीची शिक्षा झालेल्या दोन गुन्हेगारांना फासावर लटकवल्यानंतर तालिबानने ही धमकी दिली. दरम्यान, अमेरिकेने पाकला १ अब्ज डॉलरचे अर्थसाह्य मंजूर केले.
‘तहरिक- ए- तालिबान’चा प्रमुख मुल्ला फजलुल्लाह हा अफगाणिस्तानात शनिवारी हवाई हल्ल्यात ठार झाल्याचे अनधिकृत वृत्त आहे. पाकिस्तानी संरक्षण मंत्रालयाचा दुजोरा नसलेल्या टिष्ट्वटर अकाऊंटवर ‘फजलुल्लाह ठार झाल्याच्या बातमीला संरक्षण मंत्रालयाकडून दुजोरा मिळायचा आहे’, असे म्हटले.
फाशीची प्रतिक्रिया उमटेल;
कट्टरवादी मौैलवीचा इशारा
दरम्यान, येथील कट्टरवादी मौलवी मौलाना अब्दुल अझीझ यांनी शुक्रवारी इस्लामाबादेतील प्रसिद्ध लाल मशिदीत दिलेल्या प्रवचनात दोघांना दिलेल्या फाशीची प्रतिक्रिया व्यक्त होईल, असा इशारा दिला. फाशीची शिक्षा अमलात आणण्यावरील बंदी मागे घेतल्यानंतर पाकिस्तानात फाशीची शिक्षा सुनावली गेलेल्या दोन जणांना शुक्रवारी फाशी देण्यात आली. या पार्श्वभूमीवर अझीझ यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
लाल मशिदीबाहेर शुक्रवारी शेकडो लोकांनी निदर्शने करून दहशतवाद्यांना पाठिंबा देण्याचे थांबवा, अशी मागणी केली.
(वृत्तसंस्था)

सरकारने फाशीची शिक्षा अमलात आणणे सुरूच ठेवले तर आम्ही लष्कराचे अनेक अधिकारी आणि पंतप्रधान नवाज शरीफांच्या कुटुंबासह राजकीय पुढाऱ्यांची मुले ठार मारू, अशी धमकी तालिबानचा प्रवक्ता मोहम्मद खुरासनी याने ई मेलद्वारे बातमीदारांना पाठविलेल्या निवेदनात दिली.
पाकिस्तान सरकार आयएसआय आणि लष्कराच्या कारस्थानांना बळी पडत असून या दोन्ही संस्थांमध्ये सुधारणांची गरज आहे, असे तालिबानने म्हटले.

शिक्षण महत्त्वाचे...
पेशावरच्या लष्करी शाळेवरील तालिबानच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ तीन दिवसांचा दुखवटा पाळल्यानंतर शनिवारी पेशावरमधील विद्यार्थी शाळेत आले. मात्र त्यांचे चेहरे नेहमीसारखे प्रफुल्लित नव्हते. या हल्ल्यांत १३२ विद्यार्थ्यांसह १४९ जण ठार झाले.

लष्कराचा दणका : २८ दहशतवादी गारद
इस्लामाबाद : पाकिस्तानी लष्कराने दहशतवाद्यांच्या विरोधात सुरू केलेल्या कारवाईत वायव्येकडील कबायली भागात २८ दहशतवादी ठार मारले.
सुरक्षा अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार जेट लढाऊ विमानांनी खैबरच्या तिराह खोऱ्यात दहशतवाद्यांची आठ ठिकाणे नष्ट केली व त्यात २१ जण ठार झाले. पेशावर हत्याकांडाचा सूत्रधार उमर नरय मारला गेला, असे खासगी वृत्तवाहिन्यांनी सांगितले; परंतु या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. पाकिस्तानी सुरक्षा दलांनी पेशावरनजीकच्या दर्रा आदम खेल येथे ५ व अन्य एका ठिकाणी २ दहशतवादी ठार केले. पेशावर हत्याकांडानंतर दहशतवाद्यांविरुद्ध करण्यात आलेल्या कारवाईत १५२ जण मारले गेले आहेत. दहशतवादी संपेपर्यंत ही कारवाई सुरू राहील, असे लष्कर प्रमुख राहिल शरीफ यांनी म्हटले. पेशावर भागातही काही अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला, तसेच ड्रोन हल्ल्यातही काही दहशतवादी मारल्या गेल्याचे वृत्त आहे.
पेशावर हत्याकांडाचा प्रमुख उमर मन्सूर (३६) ऊर्फ स्लिम हा पाकिस्तानी तालिबान असून त्याला तीन मुले आहेत. तालिबानच्या वेबसाईटवर गुरुवारी मन्सूरचा फोटो लोड करण्यात आला. (वृत्तसंस्था)

आठ जणांविरुद्ध अटकवारंट
कराची : पाकिस्तान तालिबानचा म्होरक्या मुल्ला फजलुल्लाह आणि अन्य ७ जणांविरुद्ध पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे.
जूनमधील कराची विमानतळावरील हल्ल्याप्रकरणी फजलुल्लाह याच्यासह तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानचा माजी प्रवक्ता शाहिदउल्लाह शाहिद आणि अन्य सहा जणांविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आल्याचे वृत्त एक्स्प्रेस ट्रिब्युनने दिले आहे. पोलिसांनी आरोप दाखल केल्यानंतर कोर्टाने वॉरंट जारी केले. ८ जून रोजी कराचीतील जुन्या विमानतळाला दहशतवाद्यांनी गराडा घातला होता. रात्रभर चाललेल्या धुमश्चक्रीत दहाही दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता, तर दहशतवाद्यांच्या हल्ल्यात २७ जण ठार झाले होते. (वृत्तसंस्था)

 

Web Title: Mullah Fazlullah killed in Pak's action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.