स्वमग्न मुलाच्या हत्येसाठी आईला १८ वर्षे शिक्षा
By Admin | Updated: May 30, 2015 02:03 IST2015-05-30T02:03:53+5:302015-05-30T02:03:53+5:30
न्यू यॉर्कमध्ये सोशलाईट म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या लक्षाधीश महिलेस आठ वर्षांच्या स्वमग्न (आॅटिस्टिक) मुलाला मारल्याच्या आरोपावरून १८ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

स्वमग्न मुलाच्या हत्येसाठी आईला १८ वर्षे शिक्षा
न्यू यॉर्क : न्यू यॉर्कमध्ये सोशलाईट म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या लक्षाधीश महिलेस आठ वर्षांच्या स्वमग्न (आॅटिस्टिक) मुलाला मारल्याच्या आरोपावरून १८ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. २०१० साली मॅनहटन येथील एका आलिशान हॉटेलमध्ये तिने या मुलाची औषधाचा ओव्हर डोस देऊन हत्या केली होती. स्वमग्न मुलांसाठी जगभरात वेगळ्या शिक्षणापासून संगोपनापर्यंत अनेक प्रयोग होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या निकालास महत्त्व आहे.
गिगी जॉर्डन या ५४वर्षीय मातेने ज्युड मीरा या पोटच्या मुलाची निर्मम हत्या केली. औषधाच्या कुटलेल्या गोळ्या सिरिंजने टोचून मुलाला ठार मारल्याची कबुली तिने दिली होती. जॉर्डनच्या वकिलाने न्यायालयात असा दावा केला की, मुलाचे वडील मुलाचा लैंगिक छळ करीत असल्याने तिने त्याला ठार मारले. मॅनहटनच्या सुप्रीम कोर्टात हा खटला चालला.
न्या. चार्ल्स सालोमन यांनी जॉर्डनला तुरुंगवासाची शिक्षा ठोठावताना असे नमूद केले की, या महिलेने जे कृत्य केले त्याबद्दल तिला पश्चात्ताप होत असल्याचे दिसले नाही, त्याचे मला नवल वाटते.
आपल्याला आपल्या मुलाला वाचवता येणार नाही अशी भीती जॉर्डनला वाटत होती. फिर्यादी पक्षाच्या वकिलांच्या मते जॉर्डनने पद्धतशीरपणे आपल्या मुलाचा खून केला. त्याला घेऊन ती देशभर हिंडली. त्याच्यावर उपचार होतात काय? हे पाहिले; पण उपचार होत नाहीत असे दिसल्यानंतर तिला अपंग मूल स्वीकारणे अशक्य झाले व तिने त्याला मारून टाकले.