प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडामधील ब्रिटिश कोलंबिया येथील सर्रे येथील कॅप्स कॅफेवर अंदाधुंद गोळीबाराची घटना घढली आहे. या गोळीबाराची जबाबदारी खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंग लड्डीने घेतली आहे. तो भारतासाठी मोस्ट वॉन्टेड दहशतवादी असून देशाची सुरक्षा एजन्सी असलेल्या NIA ने त्याच्यावर १० लाख रुपयांचे बक्षीस घोषित केले आहे.
कुठे राहतो हरजीत सिंग लड्डी? -हरजीत सिंग लड्डी हा भारतात बंदी घालण्यात आलेली दहशतवादी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनलचा सदस्य आहे. सुरक्षा एजन्सींच्या मते, तो जर्मनीमध्ये राहतो. कपिल शर्माच्या कॅप्स कॅफेवर झालेल्या गोळीबारापूर्वी, विश्व हिंदू परिषदेचे नेते विकास प्रभाकर उर्फ विकास बग्गा यांच्या हत्येतही याचे नाव आले होते.
तेव्हा एनआयएने या प्रकरणाची चौकशी केली होती आणि आपल्या आरोपपत्रात म्हटले होते की, पाकिस्तानस्थित बब्बर खालसा इंटरनॅशनलचा प्रमुख वधवा सिंग बब्बर आणि जर्मनीमध्ये राहणारा हरजीत सिंग उर्फ लड्डी यांनी मिळून १३ एप्रिल २०२४ रोजी पंजाबमधील रूपनगर जिल्ह्यातील नांगल भागात विहिंप नेत्याची हत्या केली होती.
आता याच हरजीत सिंगने कॅनडातील कॅप्स कॅफेवरही गोळीबार केला आहे. याची जबाबदारीही त्याने घेतली आहे. या हल्ल्याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. यात कॅफेबाहेर कारमध्ये बसलेला एक माणूस गोळीबार करताना दिसत आहे. हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी, कपिल शर्माच्या काही जुन्या विधानांवरून संतापलेल्या हरजीत सिंगने कपिलच्या नव्याने उघडलेल्या कॅफेवर गोळीबार केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता पोलिस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत. मात्र, जर हा हल्ला खरोखरच बब्बर खालसा इंटरनॅशनलचा असेल, तर ही केवळ कपिल शर्मासाठीच नव्हे तर, भारतासाठीही चिंतेची बाब आहे.