ब्रिटनच्या ११६ वर्षांतल्या स्टील उत्पादनापेक्षा चीनची दोन वर्षातली निर्मिती जास्त
By Admin | Updated: April 19, 2016 16:58 IST2016-04-19T16:41:28+5:302016-04-19T16:58:10+5:30
जागतिक बाजारात स्वस्तात उपलब्ध होणा-या चीनच्या स्टीलमुळे आज टाटा स्टीलला ब्रिटनमधला आपल्या उद्योग बंद करण्यावाचून पर्याय राहीलेला नाही.

ब्रिटनच्या ११६ वर्षांतल्या स्टील उत्पादनापेक्षा चीनची दोन वर्षातली निर्मिती जास्त
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. १९ - आज जागतिक स्टील उद्योगात निर्माण झालेल्या मंदीसाठी मोठया प्रमाणात चीन जबाबदार आहे. चीनच्या वेगवान स्टील उत्पादनामुळे आज जागतिक स्टील उद्योगाला अस्थिरतेचा सामना करावा लागत आहे. जागतिक बाजारात स्वस्तात उपलब्ध होणा-या चीनच्या स्टीलमुळे आज टाटा स्टीलला ब्रिटनमधला आपल्या उद्योग बंद करण्यावाचून पर्याय राहीलेला नाही. चीनच्या प्रचंड व स्वस्त उत्पादन क्षमतेचा फटका इंग्लंडमधल्या स्टील उद्योगास बसल्याचे स्पष्ट दिसत आहे.
टाटा स्टील ब्रिटनमधील सर्वात मोठी पोलाद उत्पादन कंपनी आहे. ब्रिटनने १९०० सालापासून आतापर्यंत ११६ वर्षात जेवढया स्टीलचे उत्पादन केले चीनने तितकेच स्टीलचे उत्पादन फक्त दोन वर्षात केले. बाजारात उत्पादन आणि मागणीचे गणित बिघडले तर, एकतर महागाई वाढते किंवा उत्पादनची किंमत घसरते. स्टीलच्या बाबततही तेच झाले आहे. चीनच्या स्टीलमुळे बाजारात स्टीलच्या किंमती पडल्या त्याचा फटका टाटा स्टीललाच नव्हे तर, अनेक स्टील कंपन्यांना सोसावा लागत आहे.
सर्वत्रच वाईट स्थिती आहे असे नाही जगातील काही भागात अजूनही स्टील एक चांगला व्यवसाय आहे. चीनमध्ये जितक्या स्टीलचे उत्पादन होते त्यातील फक्त १२ टक्के स्टील चीन निर्यात करते. ब्राझील २४ टक्के तर, रशिया २९ टक्के स्टीलची निर्यात करतो. आगामी काळात मध्य पूर्वेत स्टील उत्पादन ५० टक्के, आफ्रिकेत २० टक्के आणि लॅटिन अमेरिकेत दहा टक्क्यांनी वाढणार आहे.
ब्रिटनमध्ये टाटा स्टीलचे प्लांट बंद झाले तर, ४३०० कर्मचा-यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे. चीनच्या स्वस्त स्टीलला रोखण्यासाठी अमेरिकेप्रमाणे आयात शुल्कात भरमसाठ वाढ करण्याची मागणी विरोधक करत आहेत तर, नोक-या वाचवण्यासाठी कंपनीचे राष्ट्रीयकरण करण्याचीही मागणी होत आहे.