अमेरिकेतील मोंटाना येथील कालिस्पेल सिटी विमानतळावर दोन विमानांची समोरासमोर टक्कर झाली, ज्यामुळे मोठी आग लागली. विमानतळावर उतरताना एक छोटे विमान तिथे उभ्या असलेल्या विमानाशी आदळल्याची माहिती आहे. या भीषण अपघातानंतर विमानतळावर घबराट पसरली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रवाशांना घेऊन जाणारे एक छोटे सिंगल- इंजिन विमान (सोकाटा टीबीएम ७०० टर्बोप्रॉप) कालिस्पेल सिटी विमानतळावर उतरत असताना विमानतळावर उभ्या असलेल्या दुसऱ्या विमानाला धडकले. यानंतर मोठी आग लागली. या दुर्घटनेनंतर पायलट आणि तीन प्रवासी सुरक्षितपणे बाहेर पडण्यात यशस्वी झाले. या घटनेत दोन प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली, त्यांच्यावर विमानतळावर उपचार करण्यात आले.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, धडकेनंतर मोठा आवाज झाला आणि परिसरात धुराचे लोट पसरले. घटनेची माहिती मिळताच, एव्हरग्रीन, स्मिथ व्हॅली, व्हाईटफिश आणि कालिस्पेल येथून अग्निशमन दलाच्या टीम्स घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवले. वेळीच मदत पोहोचल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
अमेरिकेत गेल्या आठवड्यातच उत्तर अॅरिझोना येथे एक विमान कोसळल्याची घटना घडली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. हे विमान न्यू मेक्सिकोतील अल्बुकर्क येथील सीएसआय एव्हिएशन कंपनीचे होते. या विमानातून एका रुग्णाला रुग्णालयात घेऊन जाताना हा अपघात घडला, असे सांगण्यात आले.