आफ्रिकी वाळवंटात ३0 फुटांपेक्षा जास्त मोठ्या मगरीचे जीवाश्म सापडले आहे. ट्युनिशियाच्या वाळवंटात सापडलेल्या या मगरीला मचिमोसोरस रेक्स असे नाव देण्यात आले असून, ती आतापर्यंत सापडलेली सर्वांत मोठी सागरी मगर ठरली आहे. इतिहासपूर्व काळात अस्तित्वात असलेल्या या मगरीचे वजन ३ टनांपेक्षा जास्त असू शकते, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. ‘क्रेटॅसिअस रिसर्च’ या नियतकालिकात या संशोधनाची माहिती प्रसिद्ध झाली आहे. हे जीवाश्म १२0 दशलक्ष वर्षे जुन्या खडकात सापडले आहेत. ही मगर आपले संपूर्ण आयुष्य समुद्रातच व्यतित करीत असावी, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. या जीवाश्मात मगरीची कवटी आणि काही हाडांचा समावेश आहे. इटालीच्या बोलांगा विद्यापीठाच्या फेडरिको फॅन्टी यांनी हे अवशेष शोधून काढले. नॅशनल जिओग्राफिक सोसायटीने या प्रकल्पाला साह्य केले आहे. ही मगर ३१ फुटांपर्यंतही वाढू शकत असावी, असा अंदाज फॅन्टी यांनी व्यक्त केला आहे. तिचे तोंडच पाच फुटांपेक्षा जास्त लांब होते. नंतरच्या काळात विकसित झालेल्या गोड्या पाण्यातील सारकोसचस या मगरीपेक्षा मात्र ही मगर छोटी आहे. ११0 दशलक्ष वर्षांपर्वी अस्तित्वात असलेली सारकोसचस ही मगर ४0 फुटांपर्यंत वाढू शकत होती. तिचे वजन ८ टन होते. या राक्षसी मगरीसारख्याच प्रचंड आकारमान असलेल्या मगरी कालौघात नष्ट झाल्या. त्या नैसर्गिक आपत्तीत एकदम नष्ट झाल्या की, मोठ्या कालखंडात हळहळू नष्ट झाल्या याबाबत शास्त्रज्ञांत मतभेद आहेत. ज्युरासिक कालखंडात त्या मोठ्या संख्येने अस्तित्वात होत्या एवढे मात्र खरे.
राक्षसी मगरीचे जीवाश्म सापडले
By admin | Updated: February 6, 2017 00:39 IST