अमेरिका आणि इस्रायलच्या अलीकडील हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर आता इराणच्या राजकारणात 'सुप्रीम लीडर' (सर्वोच्च नेते) पदासाठी हालचाली वेगवान झाल्या आहेत. या शर्यतीत अली खामेनेई यांचा दुसरा मुलगा मोज्तबा खामेनेई यांचे नाव सर्वात आघाडीवर असल्याचे मानले जात आहे. इराणमधील अत्यंत शक्तिशाली समजल्या जाणाऱ्या 'असेम्बली ऑफ एक्सपर्ट्स' या संस्थेकडे नवीन नेत्याची निवड करण्याची जबाबदारी आहे. पण धार्मिक पदवी आणि संविधानातील पेच हा मोज्तबा यांच्या निवडीबाबत कळीचा मुद्दा ठरू शकतो.
मोज्तबा खामेनेई यांच्या निवडीबाबत सध्या सर्वात मोठी चर्चा त्यांच्या धार्मिक पदवीवरून सुरू आहे. इराणमध्ये सर्वोच्च नेते होण्यासाठी 'अयातुल्ला' ही उच्च धार्मिक पदवी असणे आवश्यक मानले जाते. मोज्तबा यांच्याकडे सध्या 'होजात-अल-इस्लाम' (Hojatoleslam) ही मध्यम स्तरावरील पदवी आहे. मात्र, या तांत्रिक अडचणीवर मात करण्यासाठी इराणच्या इतिहासातील एका जुन्या संविधानिक बदलाचा संदर्भ दिला जात आहे.
१९८९ चा संविधानिक बदल आणि वारसा
इराणच्या संविधानात १९८९ मध्ये एक महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आली होती. त्यावेळी अयातुल्ला खोमेनी यांच्या निधनानंतर अली खामेनेई यांना सर्वोच्च नेते बनवण्यासाठी नियमात बदल करण्यात आला होता. मूळ १९७९ च्या संविधानानुसार, सर्वोच्च नेत्याकडे 'ग्रँड अयातुल्ला' ही पदवी असणे अनिवार्य होते. मात्र, अली खामेनेई त्यावेळी या पदावर नव्हते. त्यामुळे संविधानात बदल करून 'धार्मिक विद्वत्ता' (Islamic scholarship) ही अट शिथिल करण्यात आली होती. तोच पायंडा आता मोज्तबा यांच्यासाठी वापरला जाण्याची शक्यता आहे. कायद्यानुसार आता केवळ 'इस्लामिक स्कॉलरशिप' असणे पुरेसे आहे, अयातुल्ला पदवी अनिवार्य नाही.
मोज्तबा खामेनेई यांचा प्रभाव
५६ वर्षीय मोज्तबा यांनी कधीही निवडणूक लढवली नसली तरी, इराणच्या सत्ताकारणात त्यांचा मोठा प्रभाव आहे. त्यांचे 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स' (IRGC) सोबत अत्यंत जवळचे संबंध आहेत. त्यांनी नेहमीच पडद्यामागून काम करणे पसंत केले असून, ते सार्वजनिक सभांमध्ये क्वचितच दिसतात.
राजघराण्यासारखी परिस्थिती निर्माण होण्याची भीती
मोज्तबा यांची निवड झाल्यास इराणमध्ये एकाच कुटुंबाची सत्ता प्रस्थापित होईल, अशी भीती काही गटांकडून व्यक्त केली जात आहे. १९७९ च्या क्रांतीनंतर इराणने राजेशाही मोडीत काढली होती, मात्र खामेनेई यांच्या मुलाला सत्ता मिळाल्यास ती पुन्हा एका अर्थाने 'वंशपरंपरागत' सत्ता ठरेल, अशी टीकाही होत आहे. सध्या इराणमध्ये युद्धजन्य परिस्थिती आणि इंटरनेट बंदी असल्याने अधिकृत घोषणेकडे जगाचे लक्ष लागले आहे.
Web Summary : Following Khamenei's death, Mojtaba is frontrunner for Iran's Supreme Leader. His religious qualification is debated, potentially requiring constitutional adjustments like in 1989, sparking dynasty concerns amid current tensions.
Web Summary : खमेनी की मृत्यु के बाद, मोज्तबा ईरान के सुप्रीम लीडर बनने के प्रबल दावेदार हैं। उनकी धार्मिक योग्यता पर बहस है, जिसके लिए 1989 की तरह संवैधानिक समायोजन की आवश्यकता हो सकती है, जिससे मौजूदा तनाव के बीच राजवंश की चिंताएं बढ़ रही हैं।