Sheikh Hasina Muhammad Yunus: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी अल्पसंख्याकांवरील वाढत्या अत्याचारावरून अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्यावर घणाघाती हल्ला केला. न्यूयॉर्कमध्ये आयोजित एका कार्यक्रमात शेख हसीना व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे सहभागी झाल्या. कार्यक्रमात बोलताना त्यांनी युनूस यांच्यावर नरसंहाराचा आरोप केला. ते सत्तेचे भुकेले आहेत आणि अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यात ते अपयशी ठरले आहेत, असा दावाही त्यांनी केला.
कार्यक्रमात बोलताना शेख हसीना म्हणाल्या की, ५ ऑगस्ट रोजी माझी आणि माझ्या बहिणीच्या हत्येचा कट रचला गेला होता. जशी १९७५ मध्ये माझे वडील शेख मुजीब उर रहमान यांना मारण्यात आले, तसाच कट रचण्यात आला होता. मोहम्मद युनूस सत्तेचे भुकेले आहेत म्हणून त्यांना धार्मिक स्थळे हल्ल्यांपासून वाचवता येत नाहीयेत", असे गंभीर आरोप शेख हसीना यांनी केले.
मोहम्मद युनूस मास्टरमाईंड -शेख हसीना
ऑगस्टमध्ये शेख हसीना यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन भारतात आश्रय घ्यावा लागला. त्यानंतर पहिल्यांदाच त्या सार्वजनिक कार्यक्रमात बोलल्या.
"५ ऑगस्ट रोजी ढाकामध्ये शस्त्रांसह आंदोलकांना गणभवनमध्ये पाठवण्यात आले. त्यावेळी जर सुरक्षा रक्षकांनी गोळ्या चालवल्या असत्या, तर कित्येक लोकांचे जीव गेले असते. हे २५-३० मिनिटांत झालं असतं. पण, मला तिथून निघून जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही. मी सुरक्षा रक्षकांना सांगितलं की, काहीही झालं तरी गोळ्या चालवू नका", असा ५ ऑगस्ट २०२४ रोजी घडलेला प्रसंग शेख हसीना यांनी सांगितला.
"आज माझ्यावर नरसंहाराचा आरोप केला जात आहे. खरंतर युनूस यांनी खूप विचारपूर्वक नरसंहार केला आहे. या नरसंहाराचे मास्टरमाईंड विद्यार्थी समन्वयक आणि युनूस आहेत. हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन कुणालाही सोडलं जात नाहीये. ११ चर्च तोडण्यात आले आहेत. मंदिरं आणि बौद्ध प्रार्थनास्थळे तोडण्यात आली आहेत. हिंदुंनी विरोध केला तर इस्कॉन नेत्याला अटक करण्यात आले", असे शेख हसीना म्हणाल्या.
चिन्मय दास यांच्या अटकेवर काय बोलल्या हसीना?
चिन्मय कृष्णा दास यांच्या अटकेचा मुद्दा उपस्थित करत शेख हसीना म्हणाल्या, "अल्पसंख्याकांवर अत्याचार का केले जात आहेत? त्यांना निर्दयीपणे का छळले जात आहे आणि त्यांच्या हल्ले का केले जात आहेत? लोकांना आता न्यायाचा अधिकारी नाहीये. मला राजीनामा द्यायला सुद्धा वेळ मिळाला नाही. हिंसा थांबवण्यासाठी देश सोडला, पण तसे झाले नाही", अशी खंत हसीना यांनी व्यक्त केली.