मोदींकडून राजकारण शिकावे - ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टॉनी अॅबॉट
By Admin | Updated: November 18, 2014 10:14 IST2014-11-18T10:13:02+5:302014-11-18T10:14:53+5:30
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून राजकारण आणि प्रचाराचे तंत्र शिकण्यासारखे असल्याचे गौरवोद्गार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टॉनी अॅबॉट यांनी काढले आहेत.

मोदींकडून राजकारण शिकावे - ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टॉनी अॅबॉट
ऑनलाइन लोकमत
कॅनबेरा, दि. १८ - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून राजकारण आणि प्रचाराचे तंत्र शिकण्यासारखे असल्याचे गौरवोद्गार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टॉनी अॅबॉट यांनी काढले आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियातील राजकारण्यांवरही मोदी जादू चालल्याचे दिसत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ऑस्ट्रेलियाच्या संसदेला संबोधित केले. हा मान पटकावणारे ते पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरले आहे. संसदेला मोदींविषयी माहिती देताना अॅबॉट यांनी मोदींचे भरभरुन कौतुक केले. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखे आहे असे अॅबॉट यांनी सांगितले. यानंतर मोदींनी ऑस्ट्रेलियाच्या संसदेत इंग्रजीमध्ये भाषण केले. दहशतवाद हे जगासमोरील सर्वात मोठे संकट असून यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे मोदींनी सांगितले. ऑस्ट्रेलिया हा भारतासाठी महत्त्वाचा देश असून हा देश सहकारी आणि गुंतवणूकदार म्हणून भारताच्या विकासात महत्त्वाची भूमिका निभावू शकतो असे मोदींनी नमूद केले. मोदींच्या मेक इन इंडिया मोहिमेला टॉनी अॅबॉट यांनी प्रतिसाद दिला असून पुढील वर्षी भारतात ऑस्ट्रेलियन उद्योजकांसाठी परिषद घेऊ अशी घोषणा अॅबॉट यांनी केली.
भारत - ऑस्ट्रेलियामध्ये पाच महत्त्वाचे करार
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान मंगळवारी पाच महत्त्वाच्या करारांवर दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी स्वाक्षरी केली. यामध्ये सामाजिक सुरक्षा, अंमली पदार्थ नियंत्रण , सांस्कृतिक, पर्यटन आणि आरोपी हस्तांतरण करारांचा समावेश आहे.