Microsoft News: टेक जायंट मायक्रोसॉफ्टने पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. कंपनीने २५ वर्षांनंतर पाकिस्तानमधील आपले कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने २००० मध्ये पाकिस्तानमध्ये काम सुरू केले होते. कंपनीचे पाकिस्तानमध्ये कॉर्पोरेट कार्यालय नव्हते, परंतु पाकिस्तानच्या उद्योग, शिक्षण आणि सरकारी क्षेत्रात मायक्रोसॉफ्टची मजबूत उपस्थिती होती.
पाकिस्तानात मायक्रोसॉफ्ट काय करायची?मायक्रोसॉफ्टने उच्च शिक्षण आयोग (HEC) आणि पंजाब ग्रुप ऑफ कॉलेजेस (PGC) सारख्या संस्थांसोबत भागीदारी केली आहे, जेणेकरून Microsoft Teams सारख्या प्लॅटफॉर्मद्वारे डिजिटल स्किल्सची ट्रेनिंग आणि रिमोट लर्निंग दिली जाईल. सरकारी क्षेत्रात मायक्रोसॉफ्टने २०० हून अधिक उच्च शिक्षण संस्थांना तंत्रज्ञानदेखील पुरवले आहे. याशिवाय, मायक्रोसॉफ्ट प्रशिक्षण केंद्रे स्थापन करणे आणि ऑनलाइन अभ्यासक्रम देण्यासारख्या उपक्रमांमध्ये देखील सहभागी आहे.
कंपनीने घेतला मोठा निर्णय२००० ते २००७ पर्यंत मायक्रोसॉफ्टमध्ये मॅनेजर पदावर काम केलेले जवाद रहमान म्हणतात की, कंपनीचा हा निर्णय व्यवसायाशी संबंधित आहे. हा निर्णय पाकिस्तानच्या सध्याच्या वातावरणात मोठ्या कंपन्यांना काम करण्यात अडचणी येत असल्याचे दर्शवितो.
माजी राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी व्यक्त केली चिंता माजी राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनीही कंपनीचा हा निर्णय पाकिस्तानच्या भविष्यासाठी चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. त्यांनी दावा केला की, राजकीय अस्थिरता, आर्थिक अस्थिरता, वारंवार होणारे सरकार बदल, बिघडणारे कायदा आणि सुव्यवस्था, अस्थिर चलन आणि जटिल व्यापार धोरणांमुळे कंपन्यांना पाकिस्तानमध्ये काम करणे कठीण होत आहे.