अमेरिकेतील मिशिगन राज्यात बर्फाचं वादळ आल्यामुळे एक भीषण अपघात झाला आहे. सोमवारी इंटरस्टेट हायवेवर १०० हून अधिक वाहनं एकमेकांना धडकली. खराब हवामानामुळे अनेक गाड्या रस्त्यावरून घसरल्या. फॉक्स न्यूजच्या रिपोर्टनुसार, या अपघातात ३० हून अधिक सेमी-ट्रेलर ट्रक अडकून पडले आहेत. अपघाताची भीषणता पाहून पोलिसांना हायवेच्या दोन्ही बाजूंची वाहतूक तातडीने बंद करावी लागली.
हा अपघात मिशिगनमधील ग्रँड रॅपिड्स शहराच्या नैऋत्येला असलेल्या इंटरस्टेट १९६ वर झाला. मिशिगन स्टेट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत, मात्र सुदैवाने आतापर्यंत कोणाचाही मृत्यू झाल्याची पुष्टी झालेली नाही. अडकलेली वाहनं हटवण्यासाठी पोलिसांनी तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू केलं आहे.
"परिस्थिती अत्यंत भयावह"
फॉक्स न्यूजशी बोलताना प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, जोरदार वाऱ्यामुळे समोरची वाहने दिसणं देखील कठीण झालं होतं. एका पिकअप ड्रायव्हरने दिलेल्या माहितीनुसार, "आम्ही ताशी २० ते २५ मैल वेगाने गाडी चालवत होतो आणि कसाबसा आमचा ट्रक थांबवू शकलो. मागून सतत गाड्या धडकण्याचं आवाज येत होते. पुढे काय चाललं आहे हे दिसत होतं, पण मागे काय घडतेय याचा अंदाज येत नव्हता. ती परिस्थिती अत्यंत भयावह होती."
बर्फाच्या वादळाचा सामना
सध्या अमेरिकेतील अनेक राज्य भीषण बर्फाच्या वादळाचा सामना करत आहेत. नॅशनल वेदर सर्व्हिसने इशारा दिला आहे की, उत्तर मिनेसोटापासून विस्कॉन्सिन, इंडियाना, ओहायो, पेनसिल्व्हेनिया आणि न्यूयॉर्कपर्यंत कडाक्याची थंडी किंवा बर्फाच्या वादळाची स्थिती निर्माण होऊ शकते. हवामान खात्याने असाही इशारा दिला आहे की, सोमवारी रात्रीपासून मंगळवारी सकाळपर्यंत उत्तर-मध्य फ्लोरिडा आणि आग्नेय जॉर्जियामध्ये तापमान शून्य अंशांपर्यंत खाली जाऊ शकते.
अनेक ट्रक रस्त्यावर आडवे झाले
मिशिगनच्या ओटावा काउंटी शेरीफ कार्यालयाने सांगितलं की, परिसरात अनेक ठिकाणी अपघात झाले असून अनेक ट्रक रस्त्यावर आडवे झाले आहेत. अनेक कार रस्त्यावरून घसरून बाहेर गेल्या आहेत. अडकलेल्या प्रवाशांना बसद्वारे 'हडसनविले हायस्कूल'मध्ये नेण्यात आले, जिथून ते मदतीसाठी फोन करू शकतील किंवा घरी जाण्याची व्यवस्था करू शकतील. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, खराब झालेली वाहनं हटवण्यासाठी आणि रस्त्यावरील बर्फ साफ करण्यासाठी बराच वेळ लागू शकतो, तोपर्यंत इंटरस्टेट-१९६ वाहतुकीसाठी बंद राहील.
Web Summary : A massive pile-up involving over 100 vehicles occurred on a Michigan interstate due to a blizzard. At least 30 semi-trailer trucks are stranded. Many injuries reported, but no fatalities confirmed. Authorities closed the highway for cleanup and rescue efforts as severe winter weather grips the US.
Web Summary : मिशिगन में बर्फीले तूफान के कारण 100 से अधिक वाहन आपस में टकरा गए। कम से कम 30 ट्रक फंसे हुए हैं। कई लोगों के घायल होने की खबर है, लेकिन किसी की मौत की पुष्टि नहीं हुई है। खराब मौसम के कारण हाईवे बंद कर दिया गया है।