Michael Rubin On Pakistan:भारत आणि पाकिस्तानमधील अलिकडच्या तणावाने पुन्हा एकदा सिद्ध केले की, दहशतवादाला फक्त शब्दांनीच नाही, तर ठोस कारवाईनेच उत्तर द्यावे लागते. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने ज्या पद्धतीने पाकिस्तानात घुसून कारवाई केली, त्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावरही कौतुक होत आहे. दरम्यान, माजी अमेरिकन अधिकारी आणि अमेरिकन एंटरप्राइझ इन्स्टिट्यूटमधील वरिष्ठ फेलो मायकेल रुबिन म्हणाले की, भारताने केवळ लष्करीच नव्हे, तर राजनैतिकदृष्ट्याही स्पष्ट विजय मिळवला आहे.
मायकल रुबिन यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, या संघर्षात पाकिस्तानचा वाईटरित्या पराभव झाला आहे. त्यांनी यावेळी पाकिस्तानमधील परिस्थितीची तुलना एका घाबरलेल्या कुत्र्याशी केली. त्यांच्या मते, पाकिस्तान आता फक्त युद्धविरामाची याचना करत आहे. याचे कारण म्हणजे, भारताने पाकिस्तानच्या लष्करी पायाभूत सुविधांचे नुकसान केले, आता संपूर्ण जगाचे लक्ष पाकिस्तानच्या दहशतवादाला पाठिंबा देण्याच्या धोरणावर केंद्रित झाले आहे.
दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात पाकिस्तानी अधिकारी उपस्थित रुबिन पुढे म्हणाले की, जेव्हा पाकिस्तानी अधिकारी दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहतात, तेव्हा आयएसआय आणि दहशतवादी संघटनांमधील फरक सांगण्याची गरज नाही. त्यांनी त्याचे वर्णन पाकिस्तानच्या लष्करी आणि राजकीय व्यवस्थेतील एक युती असे केले. रुबिन म्हणाले की, जग आता पाकिस्तानकडून त्यांच्या व्यवस्थेतून ही दहशतवादाची घाण काढून टाकण्याची मागणी करेल.
रुबिन यांनी पाकिस्तानच्या अंतर्गत लष्करी नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि म्हटले की, जनरल असीम मुनीर आणि त्यांच्यासारख्या अधिकाऱ्यांनी खरोखरच त्यांच्या नोकऱ्या टिकवून ठेवू शकतील का, याचा विचार करावा. पाकिस्तानी सैन्य आता एक 'कर्करोग' बनले आहे, जे केवळ देशाच्या राजकारण आणि अर्थव्यवस्थेवरच परिणाम करत नाही तर संपूर्ण समाजावर एक ओझे बनले आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.