- टेकचंद सोनवणेनवी दिल्ली : नेपाळमधील सत्ताधारी कम्युन्सिट पक्षात पंतप्रधान के.पी. ओली यांच्या नेतृत्वावरून फूट पडली असून, त्याचा परिणाम भारतविरोधावरही होत आहे. नेपाळमध्ये लोकप्रिय असलेले वायबर, व्हॉटस् अॅप, चिनी वुई चॅट या सोशल मीडिया अॅपवरून भारतविरोधातील मजकूर मोठ्या प्रमाणावर फॉरवर्ड केला जात आहे. नेपाळमधील भारतीय दूतावास व परराष्ट्र मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी या साऱ्या घडामोडींकडे लक्ष ठेवून आहेत. चीनच्या कागाळ्यांमुळे नेपाळने भारतविरोधी भूमिका घेतली. चीनच्या दबावामुळेच नेपाळी कम्युनिस्ट पक्षाची महत्त्वाची बैठक व पंतप्रधान ओली यांचा राजीनामा टळला. मात्र, नेपाळी तरुणांमध्ये रोष वाढल्याने दोन्ही देशांच्या रोटी-बेटी व्यवहारावर दीर्घ परिणाम होण्याची भीती आहे.नेपाळसंदर्भात भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने अद्याप एकदाही धोरणात्मक विधान केले नाही, याकडे लक्ष वेधून हा अधिकारी म्हणाला, मागील आठवड्यात मंत्रालयातील पूर्व आशिया विभागातील संयुक्त सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांनी नेपाळ दूतावासातील अधिकाºयाशी चर्चा केली. या चर्चेचा वृत्तांत मात्र प्रसिद्ध करण्यात आला नाही. नेपाळमध्ये भारतविरोधी भावना वाढणे दोन्ही देशांच्या हिताचे नाही, असा स्पष्ट संदेश अधिकाºयांनी संबधितांना दिला. नेपाळमधील ज्येष्ठ पत्रकार बबिता शर्मा यांच्या मते पक्षात फूट टाळणे व चीनच्या दबावामुळेच सध्या कम्युनिस्ट पक्षाची बैठक टळली. मात्र, कोरोना रुग्णांमध्ये वाढ व काही भागात पूरस्थितीमुळे सरकार स्थिर ठेवण्यावरच पक्षाचा भर आहे.काय आहे चर्चा?सोशल मीडियावर पंतप्रधान ओली यांचे वादग्रस्त नकाशा मंजूर करणाºया विधेकावरील भाषणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एखादे राष्ट्र छोटे आहे म्हणून ते कमजोर आहे, असे नाही. ‘भारताने नेपाळची सीमा मान्य करावी. राजमुद्रेवर सत्यमेव जयते लिहिले आहे.या नकाशावर भारताची सत्यमेव जयते भूमिका असेल की ‘सिंहमेव जयते’, हे महत्त्वाचे ठरेल, ‘असे विधान ओली यांनी केले होते. याच विधानाचा संदर्भ देऊन वुई चॅटवर चिनी सबटायटल्समध्ये हा व्हिडिओ नेपाळमध्ये व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे भारताच्या बाजूने बोलून चीनपासून सावध राहण्यास सांगणाºया सर्वांना सरसकट देशद्रोही म्हटले जात आहे.मोठ्या आर्थिक गुंतवणुकीमुळे चीन-नेपाळ संबंध गेल्या काही वर्षांत दृढ झाले आहेत. लाखो नेपाळी विद्यार्थी चिनी भाषा शिकण्यासाठी चीनमध्ये प्रवेश घेतात. नेपाळसाठी राष्ट्रपती शिष्यवृत्तीदेखील गेल्या काही वर्षांत चीनने देऊ केली आहे. गेल्या सहा वर्षांपासून भारत-नेपाळचे संबंध तणावाचे असून, तेथे भारतविरोध वाढतो आहे.आता नेपाळने भारतीय प्रसारमाध्यमांवर बंदी घातली आहे. त्यावरूनही नेपाळमध्ये सोशल मीडियावर पंतप्रधान ओलींचे समर्थन केले जात आहे. काठमांडूमध्ये ओलींच्या समर्थनार्थ व भारत धार्जिण्या एनसीपी नेत्यांविरोधात मोठा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चांचे लोण आता नेपाळच्या छोट्या-मोठ्या शहरांमध्ये पसरले आहे.
चिनी सोशल मीडियावर नेपाळमध्ये भारताविरोधात मेसेज व्हायरल, ड्रॅगनच्या कागाळ्या सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 07:17 IST