मँचेस्टर हल्ला : एकटाच होता हल्लेखोर, स्फोटासाठी आयइडीचा केला वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2017 18:50 IST2017-05-23T14:14:25+5:302017-05-23T18:50:32+5:30
अमेरिकन पॉप गायिका आरियाना ग्रँड हिच्या संगीत कार्यक्रमादरम्यान झालेल्या हल्ल्यामागे आत्मघाती हल्लेखोराचा हात असल्याचे समोर

मँचेस्टर हल्ला : एकटाच होता हल्लेखोर, स्फोटासाठी आयइडीचा केला वापर
>ऑनलाइन लोकमत
मँचेस्टर, दि. 23 - अमेरिकन पॉप गायिका आरियाना ग्रँड हिच्या संगीत कार्यक्रमादरम्यान झालेल्या हल्ल्यामागे आत्मघाती हल्लेखोराचा हात असल्याचे समोर आले आहे. या हल्लेखोराने स्फोट घडवण्यासाठी आयइडी स्फोटकांचा वापर केल्याची माहिती ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, या स्फोटात हा हल्लेखोरही ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
सोमवारी रात्री इंग्लंडच्या मँचेस्टर शहरात झालेल्या अरियाना ग्रँडच्या पॉप कॉन्सर्टमध्ये दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात 22 जणांचा मृत्यू झाला होता. तर 59 जण जखमी झाले. या स्फोटात मुत्युमुखी पडलेल्यांमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हल्ल्याबाबत माहिती देताना ग्रेटर मँचेस्टर पोलीस दलाचे प्रमुख इयान हापकिन्स यांनी या हल्ल्यामागे आत्मघाती हल्लेखोराचा हात असल्याच्या माहितीस दुजोरा दिला आहे. मात्र हा या हल्लेखोराने एकट्यानेच हा हल्ला घडवून आणला की त्याचामागे कुठल्या प्रबळ दहशतवादी संघटनेचा हात आहे, याबाबत पोलिसांना अद्याप विश्वसनीय माहिती मिळालेली नाही. हाफकिन्स म्हणाले, "मँचेस्टर येथील कार्यक्रमात स्फोट घडवणारा हल्लेखोर एकटाच होता. त्याच्याजवळ आयइडी स्फोटके होती. कार्यक्रम संपल्यावर त्याने त्यांचा स्फोट घडवून आणला. या स्पोटादरम्यान तोसुद्धा ठार झाला. "
ग्रेटर मँचेस्टरमध्ये झालेला आतापर्यंतचा सर्वात भीषण दहशतवादी हल्ला आहे. यापुढे अशाप्रकारचा प्रसंग येणार नाही अशी अपेक्षा करूया. आरियाना ग्रँड हिच्या संगीत कार्यक्रमासाठी अनेक कुटुंबे, विशेष करून तरुण वर्ग आला होता. या हल्ल्यात त्यांना आपला जीव गमवावा लागला.
दरम्यान, या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी ब्रिटीश सरकारने आपातकालीन बैठक बोलावण्यात येणार असल्याची माहिती डाऊनिंग स्ट्रीटने प्रसिद्ध केली आहे. काल रात्री झालेला हल्ला हा 7 जुलै 2005 रोजी लंडनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतरचा सर्वात मोठा हल्ला आहे.