बमाको : जिहादींनी येथे एका हॉटेलवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर माली सरकारने देशात दहा दिवसांसाठी आणीबाणी जाहीर केली आहे. या हल्ल्यात २७ लोक ठार झाले होते. देशभरात तीन दिवसांचा राष्ट्रीय शोक पाळण्यात येत आहे.अल-काईदाशी निगडित अल मुराबितून या दहशतवादी संघटनेने अल्जेरियाच्या दहशतवादी मुख्तार बेलमुख्तार याच्या नेतृत्वाखाली हा हल्ला केला होता. आंतरराष्ट्रीय सुरक्षा सैनिकांनी आणि मालीच्या सैनिकांनी बमाको येथील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. उर्वरित संशयितांचा शोध सुरू आहे.गेल्या आठवड्यातच पॅरिस येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात ठार झालेल्या २७ नागरिकांत तीन चिनी, एक अमेरिकी आणि बेल्जियमच्या नागरिकाचा समावेश आहे. या कारवाईत तीन अतिरेकी मारले गेले. त्यांनी १०० पेक्षा अधिक लोकांना ओलिस ठेवले होते.अल-काईदाशी संबंधित संघटनांनी या देशात विस्तार करण्याचा प्रयत्न चालविल्याने २०१२ पासून या देशात अशांतता निर्माण झाली आहे. त्यापूर्वीच्या वर्षी फ्रान्सच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या लष्करी कारवाईत या अतिरेकी गटांचा सफाया करण्यात आला होता, तेव्हापासून येथे अराजकता निर्माण झाली आहे. (वृत्तसंस्था)
मालीत आणीबाणी जाहीर
By admin | Updated: November 22, 2015 03:13 IST