मालदीवमध्ये दोघा न्यायाधीशांना अटक; राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालयातील संकट गडद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 07:05 IST2018-02-07T07:05:01+5:302018-02-07T07:05:19+5:30
मालदीवमध्ये आणीबाणी घोषित केल्यानंतर सर्वोच्च न्यायालय व राष्ट्रपती यामीन अब्दुल गयूम यांच्यातील संकट अधिक गडद झाले असून, सुरक्षा दलाने सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांना अटक केली आहे. विरोधी पक्षाच्या एका प्रमुख नेत्यालाही अटक करण्यात आली आहे.

मालदीवमध्ये दोघा न्यायाधीशांना अटक; राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालयातील संकट गडद
माले : मालदीवमध्ये आणीबाणी घोषित केल्यानंतर सर्वोच्च न्यायालय व राष्ट्रपती यामीन अब्दुल गयूम यांच्यातील संकट अधिक गडद झाले असून, सुरक्षा दलाने सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांना अटक केली आहे. विरोधी पक्षाच्या एका प्रमुख नेत्यालाही अटक करण्यात आली आहे.
आणीबाणी जाहीर करण्यापूर्वी यामीन यांनी राजकीय कैद्यांची सुटका करावी, असे सुप्रीम कोर्टाचे दिलेले आदेश मानण्यास नकार दिला होता. सरकारने १५ दिवसांची आणीबाणी जाहीर केली आहे. यामीन यांनी आपले सावत्र भाऊ व माजी राष्ट्रपती मामून अब्दुल गयूम यांच्या अटकेचे आदेशही दिले होते. गयूम यांच्यावर सरकारला उलथवून टाकण्याचा प्रयत्न व लाचखोरीचे आरोप ठेवले आहेत. विरोधक मोहम्मद नशीद यांनी आणीबाणी बेकायदेशीर असल्याचे सांगितले आहे. अमेरिका, संयुक्त राष्ट्रे व अनेक देशांनी मालदीवला न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
>भारताची मदत हवी
मालदीवमधील संकटावर तोडगा काढण्यासाठी राजनयिक व लष्करी हस्तक्षेप करावा, अशी विनंती मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांनी भारताला केली आहे. न्यायाधीश व अन्यांच्या सुटकेसाठी भारताने सैन्यासह दूत पाठवावा असेही त्यांनी म्हटले आहे.