मक्केत क्रेन दुर्घटना, दोन भारतीयांसह १०७ जण ठार
By Admin | Updated: September 12, 2015 09:38 IST2015-09-12T05:41:28+5:302015-09-12T09:38:07+5:30
सौदी अरेबियातील पवित्र मक्का येथे शुक्रवारी झालेल्या क्रेन दुर्घटनेत १०७ जण ठार, तर २३८ जण जखमी झाले आहेत. या जखमींमध्ये ९ भारतीय यात्रेकरुंचा समावेश आहे

मक्केत क्रेन दुर्घटना, दोन भारतीयांसह १०७ जण ठार
ऑनलाइन लोकमत
रियाध : सौदी अरेबियातील पवित्र मक्का येथे शुक्रवारी झालेल्या क्रेन दुर्घटनेत १०७ जण ठार, तर २३८ जण जखमी झाले आहेत. या जखमींमध्ये ९ भारतीय यात्रेकरुंचा समावेश आहे. अल अरेबिया टेलिव्हिजनने याबाबतचे वृत्त प्रथम दिले. सौदीच्या नागरी सुरक्षा प्राधिकरणानेही या वृत्ताला दुजोरा दिला असून दुर्घटनेबाबत ट्विट केले आहे. दरम्यान, मृतांमध्ये दोन भारतीयांचा समावेश असल्याचे परराष्ट्र खात्याने सांगितले आहे. जखमींमध्येही १५ भारतीय असून त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित करण्यात येत असल्याचे तसेच सर्वतोपरी सहाय्य करण्यात येणार असल्याचे परराष्ट्र खात्याने स्पष्ट केले आहे.
मक्का येथील ग्रॅंड मशिदीत क्रेन उलटून ही मोठी दुर्घटना घडली. यावेळी शुक्रवार असल्याने मशिदीत नमाज अदा करण्यासाठी जास्त भाविक उपस्थित होते. जगभरातून येथे हज यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता या परिसरात विकासाची योजना हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार चार लाख चौरस मीटरवर २२ लाख भाविक एकाच वेळी थांबू शकतील असे नियोजन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर या ठिकाणी क्रेनने कामे सुरू असताना ही दुर्घटना घडली. यावेळी पाऊसही कोसळत होता. जोरदार वाऱ्यामुळे क्रेन कोसळल्याचे सांगितले जात आहे. तसेच, क्रेन कोसळल्याने मशिद परिसरात मातीचे ढिगारे पडल्याने त्याखाली अनेक जण अडकल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या दुर्घटनेत मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
या क्रेनचे काम कोणती कंपनी करत होती, नक्की अपघात कशामुळे घडला आदी कारणांचा शोध घेण्यात येत आहे. मक्केमध्ये मोठ्या प्रमाणावर करण्यात येणा-या बांधकामांना विरोध करणा-या काहीजणांनी प्रचंड प्रमाणावर क्रेन्सची कामं सुरू असताना अत्यंत गलथानपणाचा आरोप केला आहे. तसेच, या पवित्र वास्तुंची हेळसांड केल्याचा आरोपही केला आहे. मक्केतील इस्लामिक हेरीटेज रीसर्च फाउंडेशनचे सहसंस्थापक इरफान अल अलावी यांनी या हेरीटेज वास्तू प्रेषित मोहम्मद यांच्याशी दुवा सांधतात, पण याची कामं करणा-यांना पर्वा नसते असे सांगितले. त्याचप्रमाणे आरोग्य व सुरक्षा यांचाही विचार होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.