महिंदा राजपाक्षेंच्या भावांविरुद्ध गंभीर तक्रारीनंतर चौकशी सुरू
By Admin | Updated: January 19, 2015 02:40 IST2015-01-19T02:40:18+5:302015-01-19T02:40:18+5:30
श्रीलंकेचे माजी अध्यक्ष महिंदा राजपाक्षे यांचे बंधू गोटाभाया आणि बासिल राजपाक्षे यांच्या विरुद्ध करण्यात आलेल्या गंभीर तक्रारीनुसार पोलिसांनी चौकशीची चक्रे फिरविली आहेत.

महिंदा राजपाक्षेंच्या भावांविरुद्ध गंभीर तक्रारीनंतर चौकशी सुरू
कोलंबो : श्रीलंकेचे माजी अध्यक्ष महिंदा राजपाक्षे यांचे बंधू गोटाभाया आणि बासिल राजपाक्षे यांच्या विरुद्ध करण्यात आलेल्या गंभीर तक्रारीनुसार पोलिसांनी चौकशीची चक्रे फिरविली आहेत. महिंदा राजपाक्षे यांचे एकेकाळी निष्ठावंत समजले जाणारे त्यांच्याच राजवटीतील माजी जनसंपर्कमंत्री मर्विन सिल्वा यांनी महिंदा यांच्या या दोन भावांविरुद्ध पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाकडे तक्रार केली आहे.
गोटाभाया हे गुंडाची टोळी चालवितात. २००९ मध्ये त्यांनी संडे लीडरचे संपादक लसांथा विक्रमतुंगा यांच्या हत्येचे आदेश दिले होते, असा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. मर्विन सिल्वा यांच्या आरोपाबाबत चौकशी केली जात आहे, असे पोलीस प्रवक्ते अजित रोहना यांनी सांगितले. या तक्रारीत बासिल राजपाक्षे यांचेही नाव गोवण्यात आले आहे. बासिल हेही माजी आर्थिक विकासमंत्री आहेत.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर महिंदा राजपाक्षे यांच्याविरुद्ध पोलीस आणि लाचलुचपत आयोगाकडेही तक्रार देण्यात आलेली आहे. प्रसार माध्यमांवरील अलीकडच्या हल्ल्यांचा मुद्दाही उपस्थित केल्याचे सिल्वा यांनी सांगितले. सरकारचे पाठबळ असलेल्या गुंडांच्या टोळ्या पांढऱ्या व्हॅनमधून पत्रकारांचे अपहरण करून त्यांना मारहाण करण्यासाठी येत. तथापि, राजपाक्षे सरकारने याकडे कानाडोळा केला. माझ्या मुलावर महिंदा यांच्या मुलाने हल्ला केल्याचा आरोपही सिल्वा यांनी केला आहे.