मिलन दर्डा वरिष्ठ महाव्यवस्थापक, लोकमत
दावोस (स्वित्झर्लंड): स्वित्झर्लंड म्हटले की डोळ्यांसमोर हिरवी कुरणे आणि बर्फाच्छादित पर्वत येतात, पण सध्या याच भूमीत जगाच्या भविष्यातील अर्थव्यवस्थेची दिशा ठरवणारे 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम' (डब्ल्यूईएफ) रंगत आहे. या जागतिक मंचावर भारताची मान उंचावणारा महाराष्ट्र केंद्रस्थानी असून, राज्याच्या विकासाचे आणि गुंतवणुकीचे नवे दालन येथे उघडले जात आहे. भारत आता केवळ 'उदयोन्मुख अर्थव्यवस्था' राहिला नसून, तो जगासाठी संधींचा महासागर बनला आहे.
महाराष्ट्राचे निर्णायक प्रतिनिधित्व यावर्षी दावोसमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. हे केवळ औपचारिक भेटींचे सत्र नसून, जागतिक कंपन्यांना 'महाराष्ट्र गुंतवणुकीसाठी सज्ज आहे' हा स्पष्ट संदेश देण्याचा प्रयत्न आहे. राज्याचे वरिष्ठ अधिकारी आणि मंत्री जागतिक स्तरावरील कॉर्पोरेट नेत्यांशी थेट संवाद साधत आहेत. या आठवड्यात मिलन दर्डा स्वतः उदय सामंत यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील शैक्षणिक आणि सांस्कृतिक धोरणांवर चर्चा करणार असून, या चर्चाचे रूपांतर उद्याच्या मोठ्या प्रकल्पांमध्ये आणि लाखो रोजगारांमध्ये होणार आहे. भारत-स्वित्झर्लंड संबंध अधिक दृढ करण्यात भारताचे स्वित्झर्लंडमधील राजदूत मृदुल कुमार यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. सर्व क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमधील संवाद परिणामकारक होण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. आकडेवारी पलीकडचा विश्वास दावोस हे शहर नसून तो एक असा क्षण आहे जिथे जगाचा भविष्यकाळ ठरतो. येथील चर्चा केवळ आकड्यांची नसून ती 'विश्वासाची अर्थव्यवस्था' आहे. भारताकडे आज तरुण व कुशल मनुष्यबळ व डिजिटल पायाभूत सुविधांचे पाठबळ असल्यामुळे जगाचे लक्ष आपल्याकडे लागले आहे.
यात महाराष्ट्राची भूमिका निर्णायक आहे, कारण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून पुणे तंत्रज्ञानाचे केंद्र आहे. दावोसमध्ये होणारे निर्णय हे मुंबई, पुणे, नागपूर आणि संभाजीनगर सारख्या शहरांतील तरुणांच्या हातात प्रत्यक्ष काम देण्यासाठी कारणीभूत ठरणार आहेत.
लोकमतचा पुढाकार व जागतिक प्रतिबिंब 'लोकमत' मीडिया या जागतिक मंचावरील घडामोडींचे थेट रिपोर्टिंग करून महाराष्ट्रातील उद्योजकता आणि कौशल्य विकासाच्या संर्धीना प्रकाशात आणत आहे. जागतिक पातळीवर भारताबद्दलची चर्चा आता केवळ 'संभावने' पुरती मर्यादित नसून, ती 'विश्वासाच्या' टप्प्यावर पोहोचली आहे. स्वित्झर्लंडच्या शांततेतून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, विकास हा शिस्त व सातत्यातून येतो आणि महाराष्ट्र आज याच विचाराने पुढे जात आहे. स्वप्न दाखवणाऱ्या या भूमीत उभे राहून भारत आज जागतिक वास्तव घडवण्याच्या आत्मविश्वासाने बोलत आहे.
Web Summary : Maharashtra showcases investment opportunities at Davos, with CM Fadnavis and Minister Samant leading discussions. Focus is on attracting global companies and fostering partnerships. Lokmat highlights India's growing role, emphasizing Maharashtra's key position with Mumbai and Pune driving economic and technological advancements.
Web Summary : दावोस में महाराष्ट्र निवेश के अवसरों का प्रदर्शन कर रहा है, मुख्यमंत्री फडणवीस और मंत्री सामंत चर्चाओं का नेतृत्व कर रहे हैं। वैश्विक कंपनियों को आकर्षित करने और साझेदारी को बढ़ावा देने पर ध्यान केंद्रित किया गया है। लोकमत भारत की बढ़ती भूमिका पर प्रकाश डालता है, जिसमें मुंबई और पुणे आर्थिक और तकनीकी उन्नति को बढ़ावा दे रहे हैं।