जॉर्जियाच्या राजधानीत ‘लाइव्ह’ जुमानजी!
By Admin | Updated: June 15, 2015 05:18 IST2015-06-15T05:18:39+5:302015-06-15T05:18:39+5:30
पूर्वीच्या सोवियत संघातून फुटून आता स्वतंत्र देश असलेल्या जॉर्जियाच्या तिबिलिसी या राजधानीत रविवारी साक्षात ‘जुमानजी’ चित्रपटासारखी स्थिती

जॉर्जियाच्या राजधानीत ‘लाइव्ह’ जुमानजी!
तिबिलिसी (जॉर्जिया) : पूर्वीच्या सोवियत संघातून फुटून आता स्वतंत्र देश असलेल्या जॉर्जियाच्या तिबिलिसी या राजधानीत रविवारी साक्षात ‘जुमानजी’ चित्रपटासारखी स्थिती आल्याने आधीच पुराने त्रस्त झालेल्या नागरिकांमध्ये कमालीची घबराट पसरली होती. पुराचे पाणी शिरल्यानंतर येथील प्राणिसंग्रहालयातून शहरभर पळालेल्या जंगली श्वापदांना पुन्हा पकडण्याची अथवा ते शक्य नसेल तर ठार मारण्याची पोलीस आणि लष्करी सैनिकांची दिवसभर शिकस्त सुरू होती.
तिबिलिसी प्राणिसंग्रहालयाच्या प्रवक्त्या मझिया शाराशित्झे यांनी सांगितले की, प्राणिसंग्रहालयातून सुटून पळालेल्या २० कोल्ह्यांना, ८ सिंहांना, पांढऱ्या वाघांना, पट्टेदार वाघांना, लांडग्यांना आणि चित्त्यांना सुरक्षा दलाच्या जवानांनी दिवसभरात एकतर ठार तरी मारले आहे किंवा हे प्राणी अद्यापही ‘बेपत्ता’ आहेत. एकूण १७पैकी फक्त ३ पेंग्विनना पुरातून वाचविता आले, असेही त्यांनी सांगितले. शाराशित्झे यांनी इंटरप्रेस वृत्तसंस्थेला असेही सांगितले की, पुराने वेढलेल्या प्राणिसंग्रहलयाच्या जागेतून ३ मृतदेह सापडले आहेत. त्यापैकी २ मृतदेह प्राणिसंग्रहलायाच्या कर्मचाऱ्यांचे आहेत. एकीकडे पोलीस व सुरक्षा दलाचे जवान मोकाट सुटलेल्या हिंस्र श्वापदांना आवर घालण्याचा आटापिटा करीत असताना दुसरीकडे पुरात अडकलेल्या असंख्य लोकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने सुरक्षित स्थळी हलविण्यात येत होते. तिबिलिसी शहर व्हेरे नदीकाठी वसलेले आहे. अनेक तासांच्या मुसळधार पावसाने नदीच्या पुराचे पाणी शहरभर भरले. परिणामी, शहराच्या मुख्य चौकांना व रस्त्यांना जणू दुथडी भरून वाहणाऱ्या ओढ्याचे स्वरूप आले आहे. पुरात आत्तापर्यंत ८ नागरिक मृत्युमुखी पडले असून, अनेक जण अजूनही बेपत्ता आहेत, असे गृह मंत्रालयाचे प्रवक्ते निनो जॉर्जो बिआनी यांनी सांगितले. मोकाट सुटलेले सर्व प्राणी पुन्हा पकडले जाईपर्यंत रहिवाशांनी घरातच राहावे, असे आवाहन पंतप्रधान इरार्की गॅरिबॅशिविली यांनी केले. (वृत्तसंस्था)