रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ
By Admin | Updated: December 18, 2014 05:45 IST2014-12-18T05:45:14+5:302014-12-18T05:45:14+5:30
पेशावरमधील शाळकरी विद्यार्थ्यांवर झालेल्या निर्घृण तालिबानी हल्ल्याचा जगाच्या कानाकोपऱ्यातून तीव्र धिक्कार होत आहे.

रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ
इस्लामाबाद : पेशावरमधील शाळकरी विद्यार्थ्यांवर झालेल्या निर्घृण तालिबानी हल्ल्याचा जगाच्या कानाकोपऱ्यातून तीव्र धिक्कार होत आहे. त्याचवेळी अतिरेक्यांनी सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला आम्ही घेऊ, असा निर्धार पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी केला आहे.
संपूर्ण पाकिस्तानावर पसरलेली शोककळा, निष्पाप शाळकरी मुलांचा हृदयद्रावक दफनविधी, जगभरातून होत असलेले सांत्वन या पार्श्वभूमीवर शरीफ यांनी या हल्ल्यानंतरही दहशतवादविरोधी मोहीम चालूच राहील, असे नि:संदिग्ध शब्दांत स्पष्ट केले. किंबहुना याचा संदेश देण्यासाठीच पाकिस्तानने बुधवारी सर्वपक्षीय सहमतीतून फाशीच्या शिक्षेवरील बंदी तातडीने उठविली. दहशतवादाविरुद्ध सात दिवसांत ठोस कृती आराखडा तयार करण्याचा निश्चयही शरीफ यांनी जाहीर केला आहे.
संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून व सुरक्षा परिषदेने या घृणास्पद हल्ल्यातील दोषींना न्यायालयासमोर आणून कठोर शिक्षा ठोठावण्याचे आवाहन केले.
> पाकिस्तानात मृत्यूची वाट पाहणारे ८ हजार कैदी असून त्यांनी माफीचे सर्व पर्याय चोखाळले आहेत. सरकारने मृत्युदंडावरील बंदी उठवल्यास त्यांना काही आठवड्यात फाशी दिले जाऊ शकते.