लख्वीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
By Admin | Updated: January 1, 2015 16:59 IST2015-01-01T16:50:48+5:302015-01-01T16:59:43+5:30
मुंबईवरील २००८ च्या हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार झकी उर रेहमान लख्वीला पाकिस्तान न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे.

लख्वीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. १ - मुंबईवरील २००८ च्या हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार झकी उर रेहमान लख्वीला पाकिस्तान न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी १५ जानेवारी रोजी होणार आहे. एका व्यक्तीचे अपहरण केल्याप्रकरणी लख्वीला पुन्हा अटक करण्यात आली असून त्याचप्रकरणी न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
सार्वजनिक सुरक्षा कायद्याखाली लख्वीची स्थानबद्धता पाकिस्तानी न्यायालयाने सोमवारी निलंबित केल्याने त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला होता. यावरून भारताने खडे बोल सुनावल्याच्या पार्श्वभूमीवर पाकने लख्वीला मंगळवारी पुन्हा अटक करत त्याचा तुरुंगातून बाहेर पडण्याचा मार्ग बंद केला.
मुंबई हल्ल्याप्रकरणी लख्वीविरुद्ध ठोस पुरावे नसल्याचे निरीक्षण नोंदवत एका न्यायालयाने त्याला १८ डिसेंबर रोजी जामीन मंजूर केला होता. पेशावरमध्ये शाळेवर हल्ला होऊन काही दिवस उलटत नाही तोच मुंबई हल्ल्याच्या सूत्रधाराला जामीन मिळाल्यामुळे पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी भूमिकेवरच प्रश्नचिन्ह लागले होते. भारतासह जगभरातून पाकिस्तानवर टीका झाली होती. त्यामुळे पाक सरकारने सार्वजनिक सुरक्षा अबाधित राखण्याच्या आदेशातहत (एमपीओ) त्याला तीन महिन्यांसाठी स्थानबद्ध केले होते. त्यानंतर लख्वीने एमपीओखालील आपल्या स्थानबद्धतेस इस्लामाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.