लखवीला पाहिजे न्यायालयात हजर राहण्यासाठी सूट
By Admin | Updated: May 5, 2015 23:33 IST2015-05-05T23:33:45+5:302015-05-05T23:33:45+5:30
२००८ च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार व लष्कर-ए-तोईबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा सदस्य झकी-उर-रेहमान लखवी याने पाक न्यायालयात हजर राहण्यापासून सूट मिळावी, अशी विनंती न्यायालयाला केली आहे.

लखवीला पाहिजे न्यायालयात हजर राहण्यासाठी सूट
इस्लामाबाद : २००८ च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार व लष्कर-ए-तोईबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा सदस्य झकी-उर-रेहमान लखवी याने पाक न्यायालयात हजर राहण्यापासून सूट मिळावी, अशी विनंती न्यायालयाला केली आहे.
दहशतवादविरोधी न्यायालय बुधवारपासून लखवीच्या विरोधातील खटल्याची सुनावणी करणार आहे. या न्यायालयाचे न्यायाधीश सोहैल इक्रम यांनी लखवीच्या या अर्जावर ६ मेपर्यंत उत्तर द्यावे, अशी नोटीस सरकारी तपास संस्था एफआयला केली आहे. रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात असणारा लखवी व त्याचे सहा साथीदार न्यायालयीन सुनावणीस हजर राहत असत; पण १४ मार्च रोजी लखवीची सुटका झाली आहे. त्यानंतर त्याला स्वत:च न्यायालयात उपस्थित राहावे लागेल. लखवीचे वकील राजा रिझवान अब्बासी यांनी आज न्यायालयात अर्ज सादर केला असून, त्याचे अशील लखवी याला धमक्या येत असून, न्यायालयात येताना त्याची हत्या होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्याला न्यायालयात हजर राहण्यापासून सूट द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)