लखवी तुरुंगातच

By Admin | Updated: December 20, 2014 00:35 IST2014-12-20T00:35:56+5:302014-12-20T00:35:56+5:30

न्यायालयाने जामीन दिला असला तरी मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड झकी-उर-रहमान लखवी याला आणखी तीन महिने

Lakhvi jail | लखवी तुरुंगातच

लखवी तुरुंगातच

इस्लामाबाद : न्यायालयाने जामीन दिला असला तरी मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड झकी-उर-रहमान लखवी याला आणखी तीन महिने कारागृहातच राहावे लागणार आहे. कारण, पाकिस्तानने सार्वजनिक सुरक्षा कायद्याखाली (मेन्टेनन्स आॅफ पब्लिक आॅर्डर) त्याच्यावर कारवाई केली आहे. न्यायालयाने गुरुवारी लखवीला जामीन मंजूर केल्यानंतर भारतात तीव्र रोष निर्माण झाला होता व पाकवर चोहीकडून टीका होऊ लागली होती. या पार्श्वभूमीवर पाक प्रशासनाने हे पाऊल उचलले.
मेन्टेनन्स आॅफ पब्लिक आॅर्डर (एमपीओ) कायद्याखाली लखवीला शुक्रवारी तीन महिन्यांसाठी स्थानबद्ध करण्यात आले. न्यायालयाने जामीन दिल्यामुळे लखवीला रावळपिंडीतील अदियाला कारागृहातून शुक्रवारी सकाळी सोडण्यात येणार होते; मात्र सरकारने तत्पूर्वीच त्यास एमपीओखाली स्थानबद्ध केले, असे सरकारी वकील चौधरी अझहर यांनी सांगितले. लखवीविरुद्ध पुरावा नसल्यामुळे दहशतवादविरोधी न्यायालयाने गुरुवारी त्याला जामीन मंजूर केला होता. सरकारी वकिलांना न्यायालयात येण्यास विलंब झाल्याने लखवीला जामीन मिळाल्याचे सांगण्यात येत होते. या पार्श्वभूमीवर लखवीच्या वकिलांनी कारागृह प्रशासनास जामिनाचे आदेश दाखविण्यापूर्वीच प्रशासनाने त्याच्या स्थानबद्धतेचे आदेश तुरुंग अधीक्षकांना सोपविले. त्यामुळे त्याची सुटका टळली. लखवीला जामीन देण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दहशतवादविरोधी न्यायालयाच्या आदेशाविरुद्धचे अपील आम्ही तयार केले असून येत्या सोमवारी ते दाखल केले जाईल, असे चौधरी म्हणाले. (वृत्तसंस्था)

Web Title: Lakhvi jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.