उ. कोरिया म्हणते, ‘क्षेपणास्त्र चाचणी यशस्वी!’
By Admin | Updated: June 24, 2016 00:29 IST2016-06-24T00:29:15+5:302016-06-24T00:29:15+5:30
उत्तर कोरियाचे नेते किम जोंग-उन यांनी मध्यम क्षमतेच्या एका नव्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाल्याचा दावा केला आहे, तर अमेरिकेच्या सैन्य ठिकाणांसाठी हा धोक्याचा इशारा असल्याचेही म्हटले आहे

उ. कोरिया म्हणते, ‘क्षेपणास्त्र चाचणी यशस्वी!’
सोल : उत्तर कोरियाचे नेते किम जोंग-उन यांनी मध्यम क्षमतेच्या एका नव्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाल्याचा दावा केला
आहे, तर अमेरिकेच्या सैन्य ठिकाणांसाठी हा धोक्याचा इशारा असल्याचेही म्हटले आहे. सरकारी वृत्तसंस्था केसीएनए यांच्या वृत्तानुसार, काल झालेल्या मसदान क्षेपणास्त्राच्या चाचणीची किम यांनी स्वत: पाहणी केली. धोक्याच्या वेळी प्रथम अण्वस्त्र हल्ला करण्याची उ. कोरियाची क्षमता आता वाढली आहे.
अमेरिकेच्या महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ला करण्याची आमची क्षमता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मसदानची मारक क्षमता २,५०० ते ४,००० कि.मी. आहे. किमान क्षमतेमध्ये जपान आणि दक्षिण कोरिया टप्प्यात येतात, तर अधिक क्षमतेच्या टप्प्यात अमेरिका येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. गत महिन्यात उ. कोरियाकडून काही चाचण्या करण्यात आल्या होत्या, पण त्या अयशस्वी झाल्या. त्यानंतर, आता ही चाचणी यशस्वी झाली. तथापि, आजूबाजूच्या देशांच्या सुरक्षेवर काहीही परिणाम होणार नाही, असेही उ. कोरियाने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)