महाराष्ट्र सदनामुळे हाफीज सईदच्या हातात कोलीत
By Admin | Updated: July 23, 2014 17:59 IST2014-07-23T17:41:25+5:302014-07-23T17:59:58+5:30
महाराष्ट्र सदनात शिवसेना खासदारांचे कृत्य म्हणजे इस्लामी तत्वांवरील हल्ला असल्याचे प्रक्षोभक विधान मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईदने केले आहे.

महाराष्ट्र सदनामुळे हाफीज सईदच्या हातात कोलीत
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २३ - महाराष्ट्र सदनात शिवसेना खासदारांनी मुस्लीम कर्मचा-याला चपाती भरवून त्याचा रोजा मोडण्याच्या घटनेने देशभरात गदारोळ सुरु असतानाच या घटनेने मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईदच्या हातात कोलीत मिळाले आहे. शिवसेना खासदारांचे कृत्य म्हणजे इस्लामी तत्त्वांवरील हल्ला असून भारतातील मुस्लिमांनी एकत्र येऊन लढायला पाहिजे असे प्रक्षोभक विधान सईदने केले आहे.
महाराष्ट्र सदनातील शिवसेना खासदारांच्या घटनेवर दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार आणि जमात उद दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफीज सईदने ट्विटरवर ट्विट केले आहे. यात हाफीज म्हणतो, मोदी सरकारच्या काळात अशा घटना घडण्यात आश्चर्यकारक असे काहीच नाही. भारताच्या याच चेह-यामुळे पाकिस्तान तयार झाला. हा प्रकार गुजरात आणि मुझफ्फरनगर येथील पुनरावृत्तीच आहे.