Charlie Kirk Death: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक आणि उजव्या विचारसरणीचे कार्यकर्ते चार्ली कर्क यांची गुरुवारी एका कार्यक्रमादरम्यान गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ही घटना युटाह व्हॅली विद्यापीठात घडली. चार्ली 'द अमेरिकन कमबॅक टूर' कार्यक्रमासाठी येथे आले होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये चार्ली एका तंबूखाली माइक धरून बोलत असल्याचे दिसत होते. त्यानंतर अचानक त्याच्या मानेजवळ गोळी लागली ज्यामुळे खूप रक्तस्त्राव झाला आणि ते जमिनीवर पडले. या घटनेनंतर आता तपास यंत्रणांकडून कसून तपास करण्यात येत आहे. आता हल्लेखोराबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कंझर्वेटिव्ह यूथ ग्रुप टर्निंग पॉईंट यूएसएचे सीईओ आणि सहसंस्थापक चार्ली कर्क यांच्या हत्येनंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुःख व्यक्त केलं. ट्रम्प यांनी चार्ली कर्क यांना मरणोत्तर अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान 'प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडम' देण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेच्या एफबीआयने संशयिताचे दोन फोटो प्रसिद्ध केले आहेत. ३१ वर्षीय कर्क यांची विद्यापीठात सुमारे ३,००० विद्यार्थ्यांना भाषण देत असताना हत्या करण्यात आली.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या गोळीबाराच्या व्हिडिओमध्ये, कर्क लोकांशी बोलताना दिसत होती. गोळी कर्कच्या मानेला लागली आणि ते मान धरून खुर्चीवरुन पडले. एफबीआय आणि इतर अधिकाऱ्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले की संशयित हल्लेखोर अजूनही फरार आहे. एफबीआयने काळ्या टी-शर्ट घातलेल्या एका व्यक्तीचे फोटो आणि व्हिडिओ प्रसिद्ध केले आहेत ज्यामध्ये तो छतावरून उडी मारून पळून जाताना दिसत आहे. मात्र त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.
कर्क यांची हत्या करण्यामागे हेतू काय होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण ट्रम्प यांनी म्हटले आहे की त्यांना ही हत्या का करण्यात आली याचे संकेत मिळाले आहेत. कर्क यांचा मारेकरी हा महाविद्यालयीन विद्यार्थी होता असं म्हटलं जात आहे. तपासादरम्यान, अधिकाऱ्यांना जवळच्या जंगलात एक बोल्ट-अॅक्शन रायफल सापडली आहे. गोळीबारात ही रायफल वापरली गेली असावी. रायफलमध्ये तीन न फायर केलेली काडतुसे होते ज्यावर ट्रान्सजेंडर आणि फॅसिस्टविरोधी शब्द लिहिलेले होते.
दरम्यान, चार्ली जेव्हा सामूहिक गोळीबाराबद्दल विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत होते तेव्हाच त्यांना गोळी लागली. गेल्या १० वर्षांत किती सामूहिक गोळीबार झाले? असा प्रश्न चार्ली यांना विचारण्यात आला. त्यानंतर लगेचच चार्ली यांच्यावर गोळीबार झाला.