तालिबानच्या हल्ल्याला बळी पडलेल्या शाळेत पुन्हा किलबिल
By Admin | Updated: January 13, 2015 00:22 IST2015-01-13T00:22:52+5:302015-01-13T00:22:52+5:30
गेल्या महिन्यात झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानातील हजारो शाळा सोमवारी पुन्हा उघडल्या असून अतिरेकी हल्ल्याला बळी पडलेल्या पेशावरच्या सैनिकी शाळेतही विद्यार्थी परतले आहेत.

तालिबानच्या हल्ल्याला बळी पडलेल्या शाळेत पुन्हा किलबिल
पेशावर : गेल्या महिन्यात झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानातील हजारो शाळा सोमवारी पुन्हा उघडल्या असून अतिरेकी हल्ल्याला बळी पडलेल्या पेशावरच्या सैनिकी शाळेतही विद्यार्थी परतले आहेत.
हल्ल्यानंतर दहशतवाद्यांकडून धोका असल्याच्या दृष्टीने शाळांची हिवाळ्याची सुटी १२ दिवसांनी वाढविण्यात आली होती. लष्करप्रमुख राहिल शरीफ यांनी सपत्नीक आर्मी पब्लिक स्कूलमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली.
या शाळेवर तालिबानच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यात १३४ विद्यार्थ्यांसह १५० जण मारले गेले होते. या हत्याकांडानंतर संपूर्ण देशातील शैक्षणिक संस्था बंद करण्यात आल्या होत्या. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर सकाळी २० सैनिक तैनात होते. तेथील सुरक्षा व्यवस्था एखाद्या विमानतळासारखी वाटत होती.
पेशावर हे शहर पाकिस्तानच्या आदिवासी प्रदेशाच्या सीमेवर असून या भागात नेहमीच दहशतवादी हल्ल्यांची भीती असते. पण गेल्या महिन्यात पेशावर येथील शाळेत झालेल्या हल्ल्यात १३४ मुले बळी पडल्यानंतर संपूर्ण पाकिस्तानला धक्का बसला आहे.
शाळेत मुलांना पोहोचविण्यासाठी आलेल्या पालकांच्या डोळ्यातही अश्रू होते. भावुक पालकांनी जनरल राहिल शरीफ यांची भेट घेतली. यावेळी शरीफ यांनी भाषण केले नाही; पण देशातील दहशतवाद्यांचा बीमोड करू,असे आश्वासन पालकांना दिले आहे. ज्या पालकांची मुले हल्ल्यात दगावली आहेत ते आई-वडीलही शाळेत आले होते; पण अश्रू वाहत असतानाही त्यांनी जनरल शरीफ यांची भेट घेतली नाही. शाळेत येणे अतिशय दु:खद असल्याचे त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)