S. Jaishankar in London: खलिस्तान समर्थकांकडून भारताविरोधी गरळ ओकण्याचे काम सुरुच आहे. अशातच लंडनमधून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. लंडनमध्ये भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्यावर खलिस्तानच्या समर्थकांकडून हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे हा सगळा प्रकार पोलिसांसमोरच झाला. यावेळी घोषणा देणाऱ्यांपैकी एकाने भारताच्या ध्वजाचा देखील अपमान केला. त्यामुळे आता परराष्ट्रमंत्र्याचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
ब्रिटन दौऱ्यावर असलेल्या परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. मात्र याबाबत भारत किंवा ब्रिटनकडून अधिकृतपणे काहीही देण्यात आलेली नाही. लंडनमधील एका कार्यक्रमातून परतत असताना हा सगळा प्रकार घडला. परराष्ट्रमंत्री ज्यावेळी कार्यक्रमातून बाहेर पडले त्यावेळी काही खलिस्तानी हातात झेंडे घेऊन आंदोलन करत होते. यावेळी खलिस्तानी समर्थकांनी एस जयशंकर यांच्यासह अनेक भारतीय अधिकाऱ्यांना अनेकदा धमक्या दिल्या आहेत.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, गुरुवारी एस जयशंकर हे चॅथम हाऊस थिंक टँकच्या कार्यक्रमात सहभागी होऊन कारने परतत असताना ही घटना घडली. या घटनेचा एक व्हिडिओदेखील समोर आला आहे ज्यामध्ये एक व्यक्ती एस जयशंकर यांच्या गाडीजवळ आला आणि भारताचा ध्वज दाखवू लागला. त्यानंतर त्या व्यक्तीने लंडन पोलीस अधिकाऱ्यांसमोर तिरंगा ध्वज फाडला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, ब्रिटन आणि आयर्लंडच्या सहा दिवसांच्या दौऱ्यात एस जयशंकर हे उच्चस्तरीय चर्चा करणार असून तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. या भेटीमुळे दोन्ही देशांसोबतच्या भारताच्या मैत्रीपूर्ण संबंधांना नवी चालना मिळेल, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. बुधवारी, त्यांची ब्रिडेव्हिड लॅमी यांच्याशी द्विपक्षीय संबंधांसह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. केंटमधील चेव्हनिंग हाऊसमध्ये दोन दिवस दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. यामध्ये मुक्त व्यापार करारापासून रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धापर्यंत अनेक मुद्द्यांचा समावेश होता.