संयुक्त अरब अमिराती अर्थात UAE मधील शारजाह शहरात केरळच्या एका महिलेने आत्महत्या केली आहे. तिनी उचललेल्या या टोकाच्या पावलाने केवळ भारतच नाही तर दुबईतील लोकांनाही धक्का बसला आहे. संबंधित मृत महिलेचा आरोपी पती दुबईतील एका कंपनीत नोकरी करत होता. त्याला कंपनीने नोकरीवरून काढून टाकले आहे.
यासंदर्भात कंपनीच्या एचआरने दिलेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी साईट इंजिनिअर सतीश शिवशंकर पिल्लई विरोधात केरळमध्ये दाखल करण्यात आलेल्या खटल्याची आणि माध्यमांतील वृत्तांसंदर्भात माहिती मिळवली. इंजिनिअरच्या कृत्याने सर्व अधिकारी थक्क झाले. यानंतर, त्याचा पत्नीशी असलेल्या हिंसक आणि अपमानास्पद व्यवहार लक्षात घेत, त्याला नोकरीवरून काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गल्फ न्यूजने दिलेल्या वृ्त्तानुसार, "आम्ही ते सर्व व्हिडिओ आणि रिपोर्ट्स पाहून स्तब्ध झालो होतो. त्या व्हिडिओमध्ये तो आपल्या पत्नीला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या त्रास देताना दिसत आहे," असे कंपनीच्या इंजिनिअरने म्हटले आहे.
कंपनीने सतीशच्या टर्मिनेशन लेटरवरही यासंदर्भात उल्लेख केला आहे. या पत्रात कंपनीने म्हटले आहे, "आपल्याला कळविण्यात येते की, आपला आपल्या पत्नीच्या आत्महत्येत सहभाग स्पष्टपणे समोर येत आहे. यामुळे, कंपनी आपल्या दिल्या जाणाऱ्या सर्व सेवा तत्काळ बंद करत आहे. आपल्या पत्नीने, आपल्याकडून होणाऱ्या हिंसक शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये देखील हा गुन्हा आहे."
तत्पूर्वी, शनिवारी केरळमधील अतुल्या शेखर शारजाह येथील आपल्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आली होती. यानंतर, तिच्या कुटुंबाच्या तक्रारीवरून तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंडिया टुडेतील वृत्तानुसार, अतुल्याच्या आईने पोलिस तक्रार दाखल केली होती. यात आरोप करण्यात आला होता की, १८ ते १९ जुलै दरम्यान सतीशने अतुल्याचा गळा दाबला होता, तिच्या पोटात लाथ मारली होती आणि नंतर तिच्या डोक्यावर जोरात प्लेट मारली, यामुळे तिचा मृत्यू झाला.