चिमुरड्याचा जीव वाचवण्यासाठी कॅमेरा खाली ठेवून "त्याने" घेतली धाव
By Admin | Updated: April 19, 2017 17:37 IST2017-04-19T17:36:06+5:302017-04-19T17:37:53+5:30
सीरियात बॉम्ब हल्ला झाल्यानंतर जखमी अवस्थेत पडलेल्या मुलाला वाचवण्यासाठी एका फोटोग्राफरने हातातला कॅमेरा खाली ठेवून धाव घेतली

चिमुरड्याचा जीव वाचवण्यासाठी कॅमेरा खाली ठेवून "त्याने" घेतली धाव
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 - सीरियात बॉम्ब हल्ला झाल्यानंतर जखमी अवस्थेत पडलेल्या मुलाला वाचवण्यासाठी एका फोटोग्राफरने हातातला कॅमेरा खाली ठेवून धाव घेतली. तर दुस-याच क्षणी जमिनीवर एका लहान मुलाचा पडलेला मृतदेह पाहून त्याला अश्रू अनावर झाले. या फोटोग्राफरचा मुलाला हात घेऊन धावतानाचा एक फोटो प्रसिद्द झाला आहे.
गेल्याच आठवड्यात जवळच्या गावातून निर्वासितांना घेऊन निघालेली बस बंडखोरी केलेल्या पश्चिम अलेप्पो येथील रशिदीन येथे थांबल्या होत्या. टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार लहान मुलांना चिप्सच्या पॅकेट्सचं अमिष दाखवत एका व्यक्तीने त्यांना बसजवळून कारकडे नेलं आणि बॉम्बस्फोट केला. या हल्ल्यात 126 जणांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये 80 लहान मुलांचा समावेश होता.
फोटोग्राफर आणि अॅक्टिव्हिस्ट अबू अकलदेर हबक घटनास्थळापासून काही अंतरावर होते. स्फोटाच्या आवाजाने त्यांना काहीतरी भीषण घडल्याचा अंदाज आला आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
"त्या ठिकाणची दृष्य भयानक होती. डोळ्यांसमोर जखमी झालेली मुलं मृत्यूमुखी पडत होती", अशी प्रतिक्रिया हबक यांनी सीएनएनशी बोलताना दिली आहे. "मी माझ्या सहका-यांसोबत कॅमेरे बाजूला ठेवून जखमींची मदत करण्याचा निर्णय घेतला", असं त्यांनी सांगितलं.
पहिल्या मुलाजवळ हबक पोहोचले तेव्हा त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांनी दुस-या मुलाकडे धाव घेतली. त्याचा श्वास चालू होता. त्याला उचलून घेत त्यांनी रुग्णवाहिकेकडे धाव घेतली. ते लहान मुलं माझा हात पकडून माझ्याकडे पाहत होतं हे सांगताना हबक यांच्या डोळ्यांपुढे ती घटना पुन्हा एकदा उभी राहिली होती.