कझाकिस्तानमध्ये आज अझरबैजानच्या विमानाला झालेल्या अपघातामध्ये ४२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर सुदैवाने २५ प्रवासी या दुर्घटनेतून बचावले आहेत. अझरबैजान एअरलाइन्सचे एम्ब्रेयर E190AR हे विमान बाकू येथून रशियातील चेचेन्या येथे जात होते. दरम्यान, वाटेत या विमानाला अपघात झाला. आता या विमान अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
प्राथमिक तपासाबाबत माहिती देताना स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा अपघात पक्षी आदळल्याने झाली. प्रसारमाध्यमांनी प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने सांगितसे की, विमानाच्या एका इंजिनाला पक्षी धडकले. त्यामुळे ऑक्सिजन सिलेंडर फुटला. तसेच विमान कोसळण्यापूर्वीच विमानातील अनेक प्रवासी बेशुद्ध पडले.
स्थानिक अधिकारी आणि घटनास्थळावरून मिळालेल्या व्हिडीओंमधून कॅस्पियन समुद्राच्या किनाऱ्यावर कझाकिस्तानच्या अक्तो शहराजवळ झालेल्या विमान अपघातावेळी बचाव कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे अनेक लोकांचे प्राण वाचले. स्थानिक प्रसारमाध्यमांनी घटनास्थळावरून वाचलेल्या प्रवाशांचे काही व्हिडीओ प्रसिद्ध केले आहेत.
दरम्यान, विमानाला अपघात होतानाचेही अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. त्यातील एका व्हिडीओमध्ये विमान हवेत असताना त्याची उंची अचानक कमी होत ते खाली येताना दिसत आहे. तसेच काही सेकंदांमध्येच ते जमिनीवर येऊन धडकते. तसेच या विमानाला भयंकर आग लागते.