Joe Biden Continued His Rally Despite Pouring Rain and Its Winning the Internet | US Election: महाराष्ट्रानंतर आता अमेरिकेतही गाजतेय पावसातील सभा; बायडन यांचं जोरदार भाषण

US Election: महाराष्ट्रानंतर आता अमेरिकेतही गाजतेय पावसातील सभा; बायडन यांचं जोरदार भाषण

फ्लोरिडा: गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीतील शरद पवारांची साताऱ्यातील सभा प्रचंड गाजली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भर पावसात भाषण केलं. त्यावेळी त्यांच्यासमोर असलेली गर्दीची जागची हलली नाही. याच सभेनं लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसलेंचा पराभव झाला. विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादीला या सभेचा फायदा झाला. आता अशीच एक सभा अमेरिकेत झाली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्ष पदासाठी रिंगणात असलेल्या ज्यो बायडन यांची पावसातील सभा अमेरिकेत गाजत आहे. अमेरिकेत तीन दिवसांनंतर मतमोजणी आहे. त्यामुळे अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि माजी उपाध्यक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांनी चांगलाच जोर लावला आहे. नुकत्याच दोन्ही नेत्यांच्या फ्लोरिडामध्ये सभा झाल्या. रिपब्लिकन पक्षाचं सरकार पुन्हा आणण्यासाठी फ्लोरिडा राज्य महत्त्वाचं आहे. तर ट्रम्प यांना धक्का देण्यासाठी बायडन यांनी फ्लोरिडात विशेष जोर लावला आहे.बायडन यांच्या भाषणावेळी वादळी पाऊस झाला. मात्र या पावसातही बायडन यांनी जोरदार भाषण केलं. बायडन यांची रॅली ड्राईव्ह इन होती. गर्दी जमून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी समर्थकांना कार घेऊन रॅलीला उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे बायडन यांचे पाठिराखे कारमधून त्यांचं भाषण ऐकत होते. या रॅलीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना पावसात केस ओले होण्याची भीती वाटते. पण बायडन यांना तशी भीती वाटत नाही, अशा प्रकारची ट्विट्स बायडन यांच्या भाषणानंतर पाहायला मिळत आहेत. अनेकांना बायडन यांच्या भाषणानंतर माजी अध्यक्ष बराक ओबामांच्या १२ वर्षांपूर्वीच्या भाषणाची आठवण झाली आहे. बायडन यांनीदेखील त्यांच्या ट्विटर हॅडलवरून सभेतील फोटो ट्विट केला आहे. 'हे वादळ जाईल आणि नवा दिवस येईल,' असं शीर्षक त्यांनी फोटोला दिलं आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Joe Biden Continued His Rally Despite Pouring Rain and Its Winning the Internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.